आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - नाशिकमध्ये चिठ्ठी काढून राष्ट्रवादीच्या जयंत जाधव यांची निवड झाली असली तरी निखळ विजय मिळावा म्हणून फेरमतमोजणी करावी या मागणीसाठी न्यायालयात जाणार असल्याची घोषणा छगन भुजबळ यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
विधान परिषदेच्या नाशिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि शिवसेनेचे शिवाजी शहाणे यांना समान म्हणजेच 221 मते पडली होती. त्यानंतर चिठ्ठी काढून विजेत्याची निवड करण्यात आली होती. याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकची निवडणूक गाजली, परंतु वेगळ्या कारणांनी. दोन्ही उमेदवारांना समान मते पडली. एकूण 23 मते या निवडणुकीत बाद झाली. सामान्य मतदारांची मते बाद झाली तर आपण समजू शकतो, परंतु नगरसेवकांची मते बाद होतात ही विचार करायला लावणारी बाब आहे. जी मते बाद झाली ती राष्ट्रवादीचीच होती आणि ही गोष्ट योग्य नाही, असेही भुजबळ यांनी आपल्याच नगरसेवकांना सुनावले. भुजबळ पुढे म्हणाले की, चिठ्ठी काढून विजय मिळाला असला तरी निखळ विजय प्राप्त व्हावा म्हणून आपण लवकरच फेरमतमोजणीसाठी न्यायालयात जाणार आहोत. भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील नागरिकांच्या समस्यांबाबत आंदोलन छेडावे आणि यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नये, असेही सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.