आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी; चार जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात दोन गटांत रविवारी हाणामारी होऊन, यात चार जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

वडाळागावातील मेहबूबनगरात घरकुल योजना परिसरात रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन गटांत हाणामारी सुरू झाली. यात शेख गट आणि शहा गट समोरासमोर आल्याने दंगलसदृश वातावरण तयार झाले. हाणामारीत लाठय़ाकाठय़ांचा वापर झाला. सुमारे 30 ते 35 दंगलखोरांनी धुमाकूळ घालत तासभर या परिसरात दहशत पसरवली होती. हाणामारीत हुसेन कुरेशी, शेरूशहा, रजा शहा तसेच सलमान शेख हे जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी राज्य राखीव पोलिस तैनात करण्यात आले होते. पूर्ववैमनस्यातून ही दंगल घडवून आणली गेल्याचे पोलिस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी सांगितले.

दरम्यान, घटनेचे वृत समजतात उपायुक्त डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त गणेश शिंदे व 50 पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थिती आटोक्यात आणली. या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला.