आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरात एक वेळ पाण्यावरून सत्ताधा-यांत मतभेद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धरणसाठा वाढल्यानंतर शहरातील पाणीकपात रद्द करून एकच वेळ पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्याची योजनाही वादात सापडण्याची चिन्हे आहेत. एक वेळ पुरवठा केल्याने गळती थांबेल, असे समर्थन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ करीत असताना उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र स्लम भागात पाणी साठवण्यासाठी असलेली मर्यादित साधने पाहता या निर्णयास विरोध केला.

स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांच्या बैठकीनंतर रद्द झालेल्या पाणीकपातीची औपचारिक घोषणा महापौर वाघ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी महापौर व उपमहापौरांमधील मतभेदही समोर आले. यापूर्वी सिडको व सातपूर वगळता पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिकरोड या चार विभागांत दोन वेळा पाणीपुरवठा केला जायचा. पाणीकपात रद्द झाल्यानंतर शहरातील सर्वच विभागात एकच वेळ पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचा निर्णय झाला. दोन वेळा पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होत होती. तसेच, उंच भागात पाणी जाण्यास अडचणी येत होत्या. एकाच वेळी पूर्ण क्षमतेने पाणी दिल्यामुळे उंच भागातही पाणी मिळू लागले व त्यांचे श्रमही वाचत असल्याचा प्रतिसाद आल्याचा अभिप्राय पाणीपुरवठा विभागाने दिला.
त्यामुळे एक वेळ पाणीपुरवठ्याचे समर्थन महापौरांनी केले; मात्र त्यास उपमहापौरांनी आक्षेप घेतला.
ते म्हणाले की, दिवसातून दोन वेळा पुरवठा होणार नसल्याचा फटका नागरिकांना बसेल. नियोजित वेळेत लोक घरी नसतील तर त्यांना पाणी भरण्यासाठी दुसरी संधी मिळणार नाही. दुसरीकडे, स्लम भागात पाणी साठवणुकीसाठी पुरेसे साहित्य नसल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होईल, असाही दावा त्यांनी केला.

पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक : एक वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका नवीन वेळापत्रक जाहीर करेल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. पवार यांनी सांगितले.

पाण्याची बचत होईल
अनेक विभागांमध्ये दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याने मोठ्या प्रमाणात गळती होत होती. तसेच, कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. आता पूर्ण क्षमतेने पुरवठा केल्यामुळे नागरिकांनाच फायदा होईल. तसा प्रतिसादही महापालिकेला आला आहे.
अ‍ॅड. यतिन वाघ, महापौर