आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीकपातीचे सावट, महापौर दालनात होणार्‍या बैठकीत होणार फैसला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहराच्या पाणीपुरवठय़ाविषयी नियोजन करण्यासाठी सोमवारी दुपारी महापौर दालनात आयुक्तांसह खातेप्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक होणार आहे. सध्याचे उपलब्ध आरक्षण आणि त्यानुसार जुलैपर्यंत करावे लागणारे नियोजन या बैठकीत केले जाणार आहे. त्याअनुषंगाने पाणीकपात कशी करावी, याबाबतचा निर्णय याच बैठकीत होणार आहे.

आठ दिवसांपासून पाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा सोमवारी होणार्‍या बैठकीच्या निमित्ताने सध्या शमला आहे. विशेष म्हणजे, विरोधकांनीही आता पाण्यावरून राजकारण करत नसल्याचा निर्वाळा देत तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी आपली आग्रही भूमिका असल्याचे सांगितले. त्यामुळे महापौर अँड. यतिन वाघ यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

तुलनात्मक आढावा
मागील वर्षी 19 मे रोजी पाणीकपातीचा निर्णय झाला.
मागील वर्षीचे आरक्षण- 4200
यंदाचे एकूण आरक्षण- 4375
जानेवारी 2013 पर्यंत पाण्याचा वापर- 1375 (गंगापूर धरण समूह)
आरक्षणापैकी शिल्लक साठा- 2225

या उपाययोजना शक्य
पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी पर्यायी व्यवस्था करावी.
पाण्याचा गैरवापर करणार्‍यांवर कारवाई करावी.
40 टक्के पाणीगळती रोखावी.
विभागनिहाय नियोजन करावे.
वॉटर ऑडिटद्वारे पाण्याचे व्यवस्थापन झाले पाहिजे.
जनजागृतीसाठी अभियान राबवावे.
शाळा, महाविद्यालयांमधून प्रबोधन करता येणे शक्य.

विभागनिहाय नियोजन व्हावे
विरोधी पक्ष म्हणून पाण्यावरून राजकारण केले नाही. सर्वत्र दुष्काळ असल्याने विभागनिहाय नियोजन केले पाहिजे. वॉटर ऑडिटसाठी घेतलेल्या मशिन्स कुठे आहेत? अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

एकवेळ पाणीपुरवठा करावा
पूर्ण कपात करण्याऐवजी दोन वेळा पाणीपुरवठा होणार्‍या भागासह सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करावा. सिडकोसारख्या आधीच कमी पाणी मिळणार्‍या भागात कपात करू नये. त्यास विरोध आहे. लक्ष्मण जायभावे, गटनेता, कॉँग्रेस

भविष्याच्या दृष्टीने नियोजन व्हावे
जास्तीत जास्त काटकसर करून इतरांनाही पाणी मिळेल, याचा विचार व्हावा. एकवेळ पाणीकपात केली जावी. त्यास सर्मथन आहे. पाणीगळतीबाबत तातडीने पावले उचलावीत. विनायक खैरे, गटनेता, राष्ट्रवादी कॉँग्रेस

पर्यायी व्यवस्था करावी
पाण्याचे नियोजन केले पाहिजे. त्यासाठी वाद नको. इतर वापरासाठी पाण्याची वेगळी व्यवस्था केली पाहिजे. पाण्याची गळती रोखणे आव्हान आहे. ते प्राधान्याने हाती घ्यावे. प्रकाश लोंढे, गटनेता, रिपाइं