आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आयोगाकडून पीडितांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वात्सल्य निराधार गृहातून पलायन केलेल्या नऊ महिलांचा शोध लागलेला नाही. या घटनेची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी निराधार गृहास भेट देऊन या महिलांची चौकशी केली. मुलांच्या ओढीने पलायन केल्याचे या महिलांनी सांगितले.

महिला आणि बालकल्याण विभागाच्या महिला वसतिगृहातून बुधवारी पहाटे 17 महिलांनी सुरक्षारक्षकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पलायन केले होते. यातील आठ महिलांना पकडण्यात यश आले, तर नऊ महिलांचा अद्याप शोध लागला नाही. याची गंभीर दखल घेत महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ आणि सहकार्‍यांनी वात्सल्य वसतिगृहास भेट देऊन पाहणी केली. या घटनेमध्ये यंत्रणेचा दोष नसून महिलांच्या मानसिकतेतून हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. सुरक्षाव्यवस्था पुरेशी होती. भावनिक विवंचनेतून त्यांनी हा धाडसी प्रयत्न केला असल्याचे त्या महिलांनी सदर घटना सदस्यांसमोर कथन केली. महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ, महिला बालकल्याण अधिकारी योगिता पाठक, अमृता पवार यांच्यासह वात्सल्य गृहाच्या अधीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

काय आहे प्रकार : ठाणे येथील एका डान्स बारमध्ये पोलिसांनी पकडलेल्या 41 बारबालांना न्यायालयाच्या आदेशान्वये येथे पाठविण्यात आले होते. तीन महिन्यांपासून या महिला येथे वास्तव्यास होत्या. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 21 दिवसांत या महिलांना सोडणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी याबाबत अहवाल वेळेवर पाठवला नसल्याने तीन महिन्यांपासून या महिला येथे होत्या. या दरम्यान या महिलांच्या कुटुंबीयांना याबाबत काहीच कल्पना नसल्याने त्यांना सोडवण्याकरिता कोणीच पुढे आले नाही. यातील बहुतांश महिलांवर त्यांच्या कुटुंबीयाची जबाबदारी आहे.

ठाणे न्यायालयात अहवाल
ठाणे न्यायालयात या महिलांना सोडण्याबाबतचा अहवाल पाठवला आहे. परिवीक्षाधिन अधिकारी नलिनी पाटील न्यायालयात अहवाल घेऊन गेल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व जणींची मुक्तता होण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ, महिला आयोग सदस्या

यंत्रणेचा दोष नाही
या महिला विवाहित आहेत. त्यांना मुले आहेत. त्यांच्या ओढीने पलायनाचा हा धाडसी प्रकार त्यांनी केला. महिलांनी गटाने येऊन पलायन केले. मुलाबाळांच्या आणि कुटुंबीयांच्या ओढीतून त्यांनी हे कृत्य केले. न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर सर्वांची मुक्तता केली जाईल. योगिता पाठक, महिला बालकल्याण अधिकारी