आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम ‘डब्यात’, बोटावर मोजण्याइतपत विद्यार्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कोणताही कोर्स सुरू करताना त्या कोर्सची गरज त्याला मिळू शकणारा प्रतिसाद आणि तो किती काळ चालविता येईल, याबाबत विचार करूनच नवीन कोर्स सुरू करणे आवश्यक असते. मात्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या डबेवाल्यांसाठीच्या प्रशिक्षण कोर्सला मावळत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थीच मिळाले नसल्याने तो कोर्सच ठप्प पडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने सध्या विविध प्रकारचे 206 अभ्यासक्रम सुरू असून, त्यातील अनेक अभ्यासक्रमांना केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी लाभलेले आहेत. म्हणजेच ते अभ्यासक्रम सुरू करताना त्यांची व्यवहार्यता तपासण्यापेक्षाही संबंधितांशी करार करणे आणि दर दोन-चार महिन्यांनी एखादा नवीन कोर्स सुरू केल्याची घोषणा करण्यातच मुक्त विद्यापीठ धन्यता मानत आले आहे.

डबेवाल्यांचा कोर्स ठरला फार्स
मुळात डबेवाले हा समाज संपूर्ण महाराष्ट्रात आहे का? मुंबईत हे व्यावसायिक असले तरी त्यांची संख्या किती? त्यातील किती जण या कोर्सला प्रवेश घेतील? आणि तो कोर्स सुरू केल्यानंतर किती काळ चालू शकेल? त्याचा कोणताही विचार न करता विद्यापीठातर्फे धडाक्यात डबेवाल्यांचा कोर्स सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, त्या कोर्सची झालेली वाताहत पाहता हा कोर्स सुरूच का करण्यात आला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

प्रेस्टिजीयस कोर्स ठरला फ्लॉप
डबेवाल्यांचा कोर्स सुरू करण्यामागे ब्रिटनच्या प्रिन्स चाल्र्स यांनी डबेवाल्यांच्या अद्भुत मॅनेजमेंट स्कीलची प्रशंसा बर्‍याच अंशी कारणीभूत ठरली. साक्षात ब्रिटनच्या युवराजाकडून प्रशंसा लाभलेले विद्यार्थी मिळू शकतील, प्रेझेन्टेशनमध्ये त्याचा फायदा होईल, या एकाच उद्देशाने तो कोर्स सुरू करण्यात आला. तसेच तत्कालीन कुलगुरुंनी त्यांच्या प्रत्येक व्याख्यानात या कोर्सची टीमकीदेखील मोठय़ा दिमाखात वाजवून घेतली. प्रत्यक्षात आता मात्र प्रवेशांअभावी तो कोर्सच ठप्प झाल्याचे वास्तव समोर आले आहे.