आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Youths Tanmay Malsure Become Flying Officer, Sameer Kele Lieutenant Carnal

तन्मय फ्लाईंग ऑफिसर, समीर लेफ्टनंट कर्नल; एनडीएमध्ये फडकला नाशिकचा झेंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : डावीकडून तन्मय आणि समीर
नाशिक - देशभक्तीची प्रेरणा आणि जिद्दीच्या बळावर लष्करी प्रशिक्षणातील खडतर प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करत नाशिकच्या दोघांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत उज्ज्वल यश संपादन केले. यामध्ये महात्मानगर येथील तन्मय राजन मालपुरे याची फ्लाईंग ऑफिसर, तर लखमापूर (ता. बागलाण) येथील समीर राजेंद्र केले याची लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्ती झाली आहे. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर ते या पदावर रुजू होतील.

जागतिक स्तरावर बहुमान मिळविलेल्या एनडीएतील १२९ व्या प्रशिक्षणार्थी तुकडीचा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. देशभरातील ३२०, तर सहा देशांतील १८ अशा ३३८ प्रशिक्षणार्थींमध्ये नाशिकचे दोघे चमकले. तन्मय आणि समीरने तीन वर्षांच्या प्रशिक्षणात वेगवेगळ्या स्पर्धा, शिस्तबद्ध कवायती, सांघिक खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. तन्मयचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असून, त्याचे आई-वडील उच्च शिक्षित आहेत. आरवायके महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झालेला तन्मय पहिल्याच प्रयत्नात एनडीएच्या प्रवेश परीक्षेत यशस्वी झाला. या परीक्षेस देशभरातून १५ लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तन्मयची मोठी बहीण कल्याणी ही नुकतीच यूपीएससी उत्तीर्ण झाली असून, आतापर्यंतच्या वाटचालीत त्याला बहिणीचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

राज्यात नाशिकचा झेंडा : एनडीएतीलया तुकडीत महाराष्ट्रातील केवळ सातच जणांचा समावेश आहे. त्यात नाशिकच्या तन्मय समीरचा समावेश असल्याने राज्यात नाशिकचे नाव रोशन झाले आहे.

पायलटचे स्वप्न पूर्णत्वास
वेगळ करिअर करण्यासाठी एनडीएत प्रवेश मिळविला. फायटर पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण होत असून, राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सैन्य दलात दाखल झाले पाहिजे. - तन्मय मालपुरे

आत्मविश्वासाने पाऊल टाका
लहानपणापासूनच लष्कराचे आकर्षण होते. संकटांतही प्रशिक्षण पूर्ण केले. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात यश आले असून, ग्रामीण विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकावे. -समीर केले

समीरला कर्नल महाडिक पदक
मालेगावच्या काकाणी विद्यालयात सहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर समीरने सातारा सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. सातारा सैनिकी स्कूलचे विद्यार्थी आणि सीमेवर प्राणाची आहुती देणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृत्यर्थ स्कूल व्यवस्थापन एनडीएत उल्लेखनीय यश संपादित करणाऱ्या प्रशिक्षणार्थीला पदक देऊन सन्मानित करणार आहे. समीर या पदकाचा पहिलाच मानकरी ठरला.