आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचा दावा अखंडित, वीजपुरवठा मात्र वारंवार खंडित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - नाशिक शहर भारनियमनमुक्त असून, ग्राहकांना 24 तास अखंडित वीजपुरवठा केला जात असल्याचा महावितरणचा दावा फसवा ठरत आहे. गेल्या महिन्यापासून विजेच्या लपंडावामुळे शहरातील ग्राहक हैराण आहेत.

विविध कारणाने तांत्रिक बिघाड होऊन दररोज तासाभरात दोन ते तीन वेळा वीज जात आहे. याची दखल तक्रार निवारण केंद्रात घेतली जात नाही. फोन उचलला जात नाही, उचललाच तर समाधनाकारक उत्तरे मिळत नाहीत. नाशिकरोडच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या जेलरोड परिसरात विजेचा सावळा गोंधळ सुरू आहे. पुरवठा खंडित झाल्यानंतर तो दोन ते चार तास सुरळीत होत नाही. तक्रार निवारण केंद्रात 7875602498 या क्रमांकावर फोन केल्यानंतर तो कोणी उचलत नाही. कार्यालयात अधिकारी व संबंधित कर्मचार्‍यांना फोन केल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात, असा अनुभव विभागातील नागरिकांना येत आहे. विभागातील करन्सी नोट प्रेस, मध्यवर्ती कारागृह परिसर, शिवाजीनगर, गोदावरी सोसायटी 1 व 2, नारायणबापूनगर, सह्याद्री कॉलनी, ब्रrागिरी सोसायटी, एमएसईबी कॉलनी, कॅनॉल रोड परिसर, हरिविहार, प्रकाश ट्रेडर्स आदी भागातील ग्राहक हैराण आहेत. सोमवारी करन्सी नोट प्रेससह विभागातील पुरवठा खंडित झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला.

पावसाळ्यापूर्वी देखभाल

पावसाळ्यापूर्वी विभागात दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचा केलेला महावितरणचा दावा साफ खोटा ठरला आहे. वीजतारांच्या लगतच्या वृक्षांच्या फांद्या, इन्सुलेटर नांदुरुस्त होणे, वीजतारा एकमेकांना चिटकणे, ब्रेक डाऊन होणे; याशिवाय अनेक तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्यापूर्वी देखभालीची कामे न करता ही समस्या वारंवार उद्भवत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला.

सोमवारी दिवसभर खंडित

सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत किमान 10 ते 12 वेळा वीज खंडित झाली. दुपारी 4 वाजेनंतर 6.30 पर्यंत चार वेळा सबस्टेशनमध्ये बिघाड होऊन पुरवठा खंडित झाल्याने कार्यालयात विचारणा करता सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले.

पावसामुळे बिघाड होतो
पावसामुळे ओव्हरहेड लाईनमध्ये बिघाडामुळे पुरवठा खंडित होतो. तीन सबस्टेशनपैकी कोणत्याही एका ठिकाणी बिघाड झाल्यास सर्वच ठिकाणी पुरवठा खंडित होतो. प्रेसच्या लाईनवर पक्षी बसल्यामुळे सबस्टेशनला हानी पोहोचू नये म्हणून पुरवठा बंद केला होता. संजय जाधव, कनिष्ठ अभियंता

प्रतिसाद नाही
सकाळपासून वीज खंडित असल्याने तक्रार निवारण केंद्रात फोन केल्यानंतर फोन वाजत राहिला; मात्र कोणीही उचलला नाही. कार्यालयात तक्रार केल्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. अलका गोपाळे, ग्राहक