आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लेखाविभाग शिक्षण मंडळ प्रशासनातील असमन्वयात शिक्षकांचे वेतन थकता कामा नये, तसेच विशेषत: सेवानिवृत्तिवेतनधारकांची बोळवण होता कामा नये, अशी तंबी देत नवनिर्वाचित उपमहापौर गुरमित बग्गा यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
बग्गा यांनी शिक्षकांच्या थकीत वेतनासह विद्यार्थ्यंाशी संबंधित उपक्रमाला निधी का दिला जात नाही याचा शोध घेण्यासाठी दोन्ही विभागांचे अधिकारी, शिक्षण मंडळातील कारकून, तसेच संघटनांना बोलावले. या वेळी दोन्ही विभागांनी आपापल्या पद्धतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. लेखा विभागाचे अधिकारी राजेश लांडे यांनी मागील हिशेब दिल्‍याशिवाय नवीन तरतूद कशी द्यायची, असा सवाल केला. प्रशासन अधिकारी किरण कुवर यांनी यापूर्वी कामकाज बघणारे अधिकारी महापालिकेत असल्यामुळे त्यांच्याकडून हिशेब घ्यावा, अशी मागणी केली. तीन महिन्यांपासून शासन अनुदानातून पगार केला जात असून, यापुढे ते शक्य होणार नाही, असे सांगितले.
दरम्यान, त्यानंतर बग्गा यांनी दोन्ही अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत २५ सप्टेंबरपर्यंत सर्व सुरळीत करा, असे आदेश दिले. पाच कोटी रुपये तातडीने वेतनासाठी उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी लेखा विभागाकडे दिली. या वेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सुनील खेलुकर, बाळासाहेब कडलग, बाळासाहेब आरोटे आदी उपस्थित होते.

महापौरांचा आढावा
दरम्यान,महापौर अशोक मुर्तडक यांनी लेखाधिकाऱ्यांना बोलावून आढावा घेतला. शिक्षकांचे वेतन थकता कामा नये, अशी ताकीदही त्यांनी दिली.