आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक काझी गढी पुन्हा ढासळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात मंगळवारी (दि. २३) झालेल्या जोरदार पावसानंतर जुने नाशिक भागातील काझी गढीचा काही भाग भुसभुशीत झाल्याने बुधवारी (दि. २४) दुपारी गढीतील काही घरे अचानक ढासळली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
गोदावरी शेजारील शेकडो फूट उंचीवर वसलेल्या गढीचा आकार दरवर्षी थोड्या-थोड्या प्रमाणात ढासळण्यामुळे छोटा होत आहे. परिणामी, येथील स्थिती धोकादायक बनली आहे. मंगळवारी दुपारपासूनच अमरधामरोडच्या बाजूने माती ढासळत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यापासून गढीच्या कड्यावर असलेल्या काही घरांतील रहिवाशांनी घरातील काही वस्तू दुपारीच बाहेर काढून ठेवल्या होत्या. मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने काझी गढीतील काही घरे अचानक ढासळली. गेल्या वर्षी गढी ढासळल्यानंतर प्रशासनातर्फे या भागात संरक्षण भिंत बांधण्याची तयारी सुरू करण्यात करण्यात आली होती. मात्र, या कामाला ‘ब्रेक’ मिळाला आहे.
सिंहस्थात दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? काझी गढीचा काही भाग अत्यंत धोकादायक झालेला आहे. सिंहस्थात मोठ्या संख्येने भाविक येथील मार्गानेच रामकुंड परिसरात जाणार आहेत. त्यामुळे सिंहस्थात मोठी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाची अनास्था
- काझीगढीवर आम्ही ५० वर्षांपासून राहात आहोत. येथील काही भाग पावसामुळे ढासळत असून, मंगळवारी काही घरे ढासळली. प्रशासनाने या गढीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मोहन खैरनार, स्थानिक रहिवासी
पाठपुराव्याकडे दुर्लक्ष
- काझी गढीच्या संरक्षक भिंतीसाठी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू आहे. दुर्लक्षामुळे आता विभागीय आयुक्तांनीच या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची गरज आहे.
रंजना पवार, नगरसेविका
जीव धोक्यात
- गेल्या काही वर्षांपासून पाऊस आला की, काझी गढीचा काही भाग ढासळतोच. त्यामुळे गढीच्या कडेच्या भागात राहणाऱ्या सर्व रहिवाशांचा जीवदेखील आता धोक्यात आला आहे.
मीराबाई निकम, स्थानिक रहिवासी
बातम्या आणखी आहेत...