आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पकलेत नाशिकचा मयूर राज्यात अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकच्या मयूर मोरे या विद्यार्थ्याने शिल्पकलेच्या पदवी अभ्यासक्रमात मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्समध्ये ठसा उमटवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. कला क्षेत्रातील पदवीत राज्यात प्रथम येणारा मयूर हा नाशिकमधील पहिलाच विद्यार्थी आहे. यापूर्वी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कला मेळाप्रदर्शनातही मयूरने न्यूड स्कल्प्चर साकारत सुवर्णपदक मिळविले आहे.
गणेश चौकातील मयूर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्समध्ये ‘मानवी शरीरशास्त्र’ या विषयात पदवी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचा हा अभ्यासक्रम असतो. पदवीच्या अंतिम वर्षात त्याने कोल्हापूर, रत्नागिरी, सावर्डे, खामगाव, नाशिक, अमरावती आदी विभागांतील आर्ट कॉलेजला पिछाडीवर टाकले. मयूरचे वडील शांताराम मोरे हे सिडकोत शाडूच्या गणेशमूर्ती साकारतात. मोरे कुटुंबीय गेल्या ८१ वर्षांपासून मूर्तीकाम करीत आहेत. मयूरची ही चौथी पिढी असून, हाच वारसा जोपासत मयूरने प्रयत्नपूर्वक जे. जे. मध्ये प्रवेश मिळविला होता.
महाविद्यालयातील कलामेळ्यात १९०० कलाकारांनी कलाकृती सादर केल्या होत्या. त्यात मयूरने वास्तववादी स्त्रीचे न्यूड शिल्प सोळा दिवसांत साकारले होते. फायबरच्या माध्यमातील ४.३ फूट उंचीचे हे शिल्प हावभाव, बारकावे आणि मांडणी यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. गीतकार गुलजार, गायिका शोभा मुदगल, गायक सुदेश भोसले आणि अभिनेता अमोल पालेकर यांनीही या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले होते.
आता पदव्युत्तर शिक्षण घ्यायचेय
- कलेच्या देवतेची उपासना आज फळाला आली असं मला वाटतंय. जे. जे. स्कूलमधील अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला, हीच माझ्यासाठी मोठी संधी होती. त्यामुळे त्या संधीचं सोनं करण्याची मोठी जबाबदारी होती. शिवाय, आमच्या पिढ्यांचा वारसाही पुढे चालवायचा आहेच. आता यापुढे याच महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा विचार आहे. मला अजून मूर्तीकलेत खूप काम करायचे आहे.
मयूर मोरे, शिल्पकार