आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१७५ वर्षे धगधगत राहिलेला नाशिकचा ज्ञानयज्ञ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रारंभीच्या काळात सरकारवाडा येथे सुरू झालेल्या वाचनालयाचे दुर्मिळ छायाचित्र.)
नाशिकचे भूषण असलेले सार्वजनिक वाचनालय १७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या पावणेदोनशे वर्षांत नेटिव्ह लायब्ररी, सरकारवाडा ते आताची भव्य इमारत असे स्थलांतर करत ‘सावाना’ने इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत अनेक स्थित्यंतरं बघितली. प्रतिष्ठित साहित्यिक, राजकीय धुरिणांनी भेट देऊन या ज्ञानयज्ञाचे त्या-त्या वेळी भरभरून कौतुक केले. ‘सावाना’च्या याच शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘दिव्य मराठी’ आपल्या वाचकांना आजपासून वर्षभर रोज सादर करीत आहे रंजक माहिती, अाठवणी अन् बरंच काही...


स्थापना कालापासून आजपर्यंत कार्यरत असणारे इतके जुने सार्वजनिक वाचनालय महाराष्ट्रात दुसरे नाही, हे आता सर्वज्ञात झाले आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, पहिल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा इतिहास विस्ताराने समजण्यासाठी काही साधने वा आधार उपलब्ध नाहीत. सन १८८३ मध्ये ‘नाशिक गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले, तेव्हा पहिला भक्कम संशोधन आधार मिळाला. आपले वाचनालय स्थापन झाले तेव्हा नाशिक शहरावर इंग्रजांचा अंमल होता. वाचनालय त्या वेळच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मिशनरी मंडळींच्या प्रोत्साहनाने सुरू झाले, असे अनुमान बांधता येते. वाचनालयाची स्थापना नव्या पेशवे वाड्यात म्हणजे सरकारवाड्यात झाली. पण, त्या वेळी सरकारवाड्यात जिल्हाधिकारी कार्यालय इतर सरकारी कार्यालये असल्याने वाचनालय गो. ह. देशपांडे मार्गावरील राजेबहाद्दर वाड्यातील विस्तृत दिवाणखान्यात हलविण्यात आले. नाशिक नगरपालिकेचे कार्यालयही याच वाड्यात होते. आज या जागेवर चित्रमंदिर हे चित्रपटगृह उभे आहे. या जागेत वाचनालय नेमके कोणत्या वर्षी हलवले, याचे संदर्भ उपलब्ध नसले तरी आॅगस्ट १८२४ रोजी ते सरकारवाड्यातील दुसऱ्या मजल्यावरील भव्य दिवाणखान्यात आल्याचे संदर्भ सापडतात.
१८८३ मध्ये वाचनालयातील ग्रंथसंख्या २००० होती. १८४० ते १८६४ पर्यंत वाचनालयाचा कारभार वर्गणीदारांवर अवलंबून होता. १८६४ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाल्यावर पालिकेतर्फे वाचनालयास दरवर्षी १०० रुपये अनुदान मिळू लागले. शासनाने किंवा लोकल बोर्डाने आर्थिक मदत केल्याचे कुठेही अाढळत नाही. १८८३ मध्ये वर्गणी दर २५ पैसे ते रुपये होता. वर्गणीचे मासिक उत्पन्न ५० रुपये असायचे. असा वाचनालयाचा ढाेबळ इतिहास. ताे पुढे विस्तृत येणारच अाहे. तसेच, वाचनालयासाठी कविवर्य कुसुमाग्रजांनी केलेले प्रयत्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेेले मार्गदर्शन यासह अाजपर्यंत वाचनालयाला डाॅ. बाबासाहेब अांबेडकर, यशवंतराव चव्हाण, अाचार्य अत्रे, मानवेंद्रनाथ राॅय, मामासाहेब दांडेकर, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, प्रबाेधनकार ठाकरे यांच्यापासून ते पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, राम शेवाळकरांपर्यंत अनेक दिग्गजांनी भेट देऊन या साहित्य चळवळीचा केलेला गाैरवही. त्या सचित्र अाठवणी, वाचनालयाच्या भरभराटीची स्थित्यंतरे, वाचनालयातील ग्रंथसंपदा, संदर्भ ग्रंथ, विविध साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रम असा संपूर्ण धांडाेळा या शतकाेत्तर अमृतमहाेत्सवी वर्षात ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी ‘सावाना १७५’ या सदरातून अाम्ही देणार अाहाेत.

क्रमश:...