आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या वाघ कुटुंबीयास प्रजासत्ताक दिनाचे राष्‍ट्रपती भवनाकडून निमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील आदिवासी कुटुंब आपल्या परिवारासोबत याच छोट्या झोपडीत राहते.
इगतपुरी - पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट उपासणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील एका सर्वसामान्य दांपत्यास प्रजासत्ताकदिनासाठी राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रण मिळाले आहे. बाळू माया वाघ संगीता बाळू वाघ असे या दांपत्याचे नाव आहे. वाघ दांपत्य मासेमारी विटभट्टीवर काम करून आपला उदरनिर्वाह चालवितात. प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण पाहून वाघ दांपत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवरील मुख्य कार्यक्रमात देशातील सामान्यातील सामान्य व्यक्तींना दरवर्षी निमंत्रित केले जाते. यंदा राज्य आदिवासी विभागाकडून इगतपुरी तालुक्यातील धामणीचापाडा येथील वाघ दांपत्याची निवड करण्यात आली आहे. डोंगरदऱ्यांत भटकंती करीत संसाराचे रहाटगाडे हाकणारे हे दांपत्य मासेमारी करते. इतर वेळी विटभट्टीवर काम करते. जमिनीला टेकलेल्या एका छोट्या झोपडीत वाघ दांपत्य दोन मुली एक मुलासह वास्तव्यास आहेत. शिक्षणाचा कुठलाही गंधही नसताना त्यांना आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. एक मुलगी पदवीधर आहे. अशा या दांपत्यास देशाच्या सर्वोच्च कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरले नाही. २६ जानेवारीला त्यांना जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या सर्व शासकीय प्रक्रिया आणि पोलिस चौकशीचा सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत.
पिढ्यान‌्पिढ्या मासेमारी मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत आहोत. आम्हाला देशाचे पाहुणे म्हणून दिल्ली येथे बोलाविले असून, आमच्याकडे काय बोलावे यासाठी शब्दच नाही. - संगीता वाघ, मानकरी

राष्ट्रपती भवनामध्ये जाणार आहे, त्यामुळे विशेष आनंद वाटत आहे. आमच्यासारख्यांना शक्य होणारी गोष्ट घडत आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींना इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध असणारा तांदूळ गावठी बोरं घेऊन जाणार आहोत. - बाळू वाघ, मानकरी
बातम्या आणखी आहेत...