आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 टक्के रस्त्यांचीच रोज स्वच्छता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात खासगीकरणातून हायटेक सुविधा देण्याचे स्वप्न सत्ताधारी मनसे एकीकडे दाखवत असली तरी, दुसरीकडे मात्र शहरात दररोज केवळ 22 टक्केच रस्त्यांची सफाई होत असल्याची धक्कादायक बाब पर्यावरण विभागाच्या नुकत्याच मंजूर केलेल्या अहवालातून उघड झाली आहे. गोदावरी तीरावर वसलेल्या गावठाण व तीर्थक्षेत्रांच्या परिसरातील अरुंद गल्ल्यांमुळे 70 टक्के घरांतील कचरा उचलणे बिकट झाले आहे. जेथे तीन लाख घरांचा कचरा उचलणे अवघड झाले आहे, तेथे कुंभमेळ्यात शहरात येणार्‍या लाखो भाविकांमुळे तयार होणारा कचरा कसा उचलणार, असा यक्षप्रश्न पालिकेसमोर आता उभा ठाकला आहे.

दरवर्षी पालिका शहरातील पर्यावरणीय परिस्थितीचा अभ्यास करून महासभेवर अहवाल ठेवते. 2013 या वर्षातील हवा, पाणी व वायू प्रदूषणाचा अहवाल नुकताच महासभेने मंजूर केला. या अहवालात महापालिका क्षेत्रातील घनकचर्‍याची समस्या दिवसेंदिवस अडचणीची होत असल्याचे समोर आले आहे. 2011 मधील जनगणनेप्रमाणे पालिका क्षेत्रातील तीन लाख घरांतून कचरा उचलला जातो. कचर्‍याचे प्रमाण 393 टन इतके असून, प्रत्यक्षात 363 टनच कचरा उचलला जात आहे. प्रतिदिन 30 टन कचरा विविध भागात साचतो. विशेष म्हणजे, हा कचरा घरोघरी जाऊन उचललेला असून, यात रस्त्याच्या बाजूकडील कचर्‍याचा अंतर्भाव केल्याबाबतच उल्लेख नाही. याउलट शहरात 2632 किलोमीटर लांबीचे रस्ते असून, दररोज केवळ 516 किलोमीटर रस्त्यांचीच सफाई होते. याचाच अर्थ जवळपास 22 टक्के रस्त्यांचीच सफाई होत असल्याचे व 2116 किलोमीटर लांबीचे रस्ते कचर्‍याखाली राहात असल्याचे स्पष्ट होते. कचर्‍याची समस्या दैनंदिन असून, यात प्रामुख्याने पालापाचोळा तसेच पादचारी व विक्रेत्यांकडून टाकल्या जाणार्‍या घाणीचा समावेश आहे.
नोकरभरती प्रक्रिया लवकरच
वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने नोकरभरतीला मान्यता दिली नाही. दुसरीकडे निवृत्ती व अन्य कारणाने सफाई कर्मचार्‍यांची संख्या घटली. शासनाने आता खासगीकरणाद्वारे कर्मचारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, लवकरच नोकरभरती केली जाईल.
अ‍ॅड. यतिन वाघ, महापौर

दोन हजार कर्मचार्‍यांची गरज
वाढती लोकसंख्या लक्षात घेता सफाई कर्मचार्‍यांचे प्रमाण कमी आहे. जवळपास दोन हजार सफाई कर्मचार्‍यांची गरज आहे.
- डॉ. सुनील बुकाने, आरोग्याधिकारी, महापालिका
महापौरांच्या प्रभागात कर्मचार्‍यांची फौज
खुद्द महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी 20 जून रोजीच्या महासभेत माझ्या प्रभागात 70 कर्मचारी ठेवण्याची गरज काय, असा सवाल केला होता. एवढेच नव्हे, तर सिडको व सातपूरपेक्षा नाशिक पूर्व, पश्चिम प्रभागात सर्वाधिक सफाई कर्मचारी असल्याचे आढळले होते. त्यानंतर महापौरांनी जेथे गरज नाही असे कर्मचारी अन्यत्र हलवण्याचे आदेश दिले. मात्र, राजकीय दबावामुळेच 20 कर्मचार्‍यांच्याच बदल्या झाल्या. त्यात काही सफाई कर्मचारी संघटनांनी कर्मचारी ज्या भागात राहतो, तेथेतच काम देण्याची मागणी लावून धरल्यामुळे अडचणी वाढल्याचे सांगितले जाते.

आधुनिक यंत्रसामग्री वापराची सूचना
सध्या घंटागाडीद्वारे कचरा उचलून तो खत प्रकल्पापर्यंत नेला जातो. मात्र, पालिकेला ‘नाशिक स्वच्छ व सुंदर’ करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री व नवीन पद्धतीचा वापर करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.

1500 कर्मचार्‍यांची गरज
पालिकेला 3200 कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात 1700 कर्मचारी कार्यरत असल्याचे महासभेत शिवाजी सहाणे यांनी सांगितले. 1500 कर्मचार्‍यांच्या भरतीची गरज आहे; मात्र शासन परवानगी देत नसल्यामुळे मानधनावर भरती करण्याचा निर्णय झाला आहे.