आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखभालीकडे काणाडोळा, बनला मृत्यूचा सापळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा परिसरात रविवारी रात्री आई-वडिलांसोबत दर्शनासाठी आलेल्या आठ वर्षीय अयान निजामुद्दीन शेख या चिमुरड्याचा ट्रान्सफॉर्मरला चिकटल्याने मृत्यू झाला. वास्तविक बडी दर्गा परिसर अत्यंत वर्दळीचा असतो. या ठिकाणी जुलूससाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. अशा परिस्थितीत भिंतीलगत लावलेला उच्च दाबाचा ट्रान्सफॉर्मर म्हणजे यमदूत बनूनच उभा असल्याचे दिसून आले. रविवारी झालेल्या घटनेच्या निमित्ताने शहरातील उघड्या डीपी अन् धोकेदायक ट्रान्सफॉर्मर्ससह महावितरणचा अनागोंदी कारभारदेखील चव्हाट्यावर आला.
घटनांची मालिका
31 जुलै रोजी खडकाळी सिग्नल जवळील ट्रान्सफॉर्मरवरील शॉर्टसर्किटमुळे वीजतार तुटल्याने रस्त्यावरून जात असलेल्या मुजाहीद अमिन सय्यद (वय-17, गैबन शहानगर, खडकाळी) व शाहबाज यासीन सय्यद (वय-21, खडकाळी) यांच्या अंगावर पडली. त्यात दोघांना विजेचा झटका लागल्याने गंभीर जखमी झाले होते.

31 जुलै रोजीच जुने नाशिक भागातील काही ठिकाणी रोहित्रांवरील (ट्रान्सफार्मर) शॉर्टसर्किटमुळे अनेकांचे टीव्ही, फ्रीजही बंद झाले. तर काही उपकरणे जळाली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला.

पंधरा दिवसांपूर्वी वडाळारोड येथील रेणुकानगर परिसरातील रोहित्राला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. महिनाभरात तीन वेळा रोहित्राला आग लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतरही त्याकडे दुर्लक्ष होते आहे.

वडाळागाव येथील पालिका उद्यानात खेळणार्‍या शाहीद अकिल शेख (वय-8 ) हा रोहित्रातील गरम ऑईल पडल्याने गंभीर भाजला होता, तर दुसर्‍या घटनेत, तिडके कॉलनी येथील कोमल हाइट्स अपार्टमेंटलगत संरक्षणासाठी असलेल्या तारेच्या जाळ्यात विद्युतप्रवाह उतरल्याने जाळीला चिकटून गोपाल सिंग ठाकूर यांच्या 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.

मोरवाडी गावात दोन वर्षांपूूर्वी एका ट्रान्सफॉर्मरमध्ये लहान मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्या वेळी या ट्रान्सफॉर्मरलगत जाळ्या लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती. ती आजही पूर्ण झालेली नाही. यावरून महावितरणची बेफिकिरी दिसून येते.
या भागातील ट्रान्सफॉर्मर आहेत धोकेदायक
जुने नाशिक : खडकाळी सिग्नलजवळील ट्रान्सफॉर्मरला नेहमीच आग लागते. इकबाल हॉटेलजवळील ट्रान्सफॉर्मर धोकेदायक आहे. मुलतानपुरा परिसरातील पालिका रुग्णालयालगतच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती. कथडा भागातील ट्रान्सफॉर्मरला संरक्षक जाळी नाही. हरिमंजील सोसायटीजवळील ट्रान्सफॉर्मरच्या वायर्स रस्त्यावर आल्या आहेत. संतकबीरनगर येथील ट्रान्सफॉर्मर धोकेदायक आहे. रेणुकानगर भागातील ट्रान्सफार्मरला नेहमीच आग लागण्याच्या घटना घडतात.

सिडको : डीजीपीनगर, वावरेनगर, उपेंद्रनगर, विजयनगर, उत्तमनगर, शिवाजी चौक, एमआयडीसी व अंबड भागात अनेक ट्रान्सफॉर्मर उघडे आहेत.

सातपूर : महादेववाडीतील सार्वजनिक शौचालयाजवळील ट्रान्सफॉर्मर धोकेदायक आहे. संरक्षक जाळ्याही नाहीत. स्वारबाबानगरातील ट्रान्सफॉर्मरला शॉर्टसर्किटची मोठी समस्या आहे.

पंचवटी : पेठरोड, फुलेनगर, दत्तनगर व मखमलाबाद नाका परिसरातील घरांवरून विजेच्या तारा गेल्या आहेत. येथे कपडे वाळत टाकताना दोन वर्षांपूर्वी एका महिलेचा वीजतारांना चिकटून मृत्यू झाला होता.
महावितरण उपअभियंता आर. एस. आव्हाड यांना थेट प्रश्न

शहरातील अनेक ट्रान्सफॉर्मर्स धोकेदायक स्थितीत आहेत. त्यांची दुरुस्ती केव्हा होणार?
जुन्या नाशकातील 30 ते 40 वर्षांपूर्वीचे जुने ट्रान्सफॉर्मर सध्या सुरू आहेत. त्यातील धोकेदायक ट्रान्सफॉर्मरची लवकरच दुरुस्ती केली जाईल.

सुरक्षेची व्यवस्था नसल्याने ट्रान्सफॉर्मरचे अपघात होतात, त्यासाठी काय करता येईल?
शहरातील बहुतांश ट्रान्सफॉर्मरसह वितरण पेट्यांना दरवाजे बसविण्यात आले होते. परंतु, त्यांची शहरातील भुरट्या चोरट्यांकडून चोरी झाली आहे. उघड्या अवस्थेतील वितरण पेट्यांना लवकरच नव्याने सुरक्षित जाळ्या व झाकणे बसविण्यात येतील.

रेणुकानगर व खडकाळी भागात अनेकदा रोहित्र जळाले आहे. अपघात होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येतील?
नागरिकांकडून ट्रान्सफॉर्मरलगत कचरा पेटवला जातो. या कारणामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होण्याची शक्यता अधिक असते. काही ठिकाणी जेथे संरक्षक व्यवस्था नाही, तेथे ती उभारण्यात आल्यानंतर अशा कारणांमुळे होणारे संभाव्य अपघात टळू शकतील.

महावितरण व पालिकेत टोलवाटोलवी
महावितरण कंपनी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांशी शहरातील धोकेदायक अवस्थेतील ट्रान्सफॉर्मर्ससह उघड्या असलेल्या वितरण पेट्यांबाबत संपर्क साधला असता दोघांकडून टोलवाटोलवी सुरू असल्याचेच दिसून आले. महावितरण कंपनीचे अधिकारी म्हणाले की, महानगरपालिकेने वाढीव बांधकामास परवानगी देताना तेथील ट्रान्सफॉर्मर्स किंवा अन्य विद्युतपुरवठ्याशी संबंधित उपकरणांची सत्यस्थिती लक्षात घेऊनच परवानगी द्यावी. तर महापालिकेचे अधिकारी म्हणाले की, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महावितरणने त्याबाबत लक्ष घालावे. या दोघांची परस्परविरोधी भूमिका बघता दोन्ही यंत्रणा केवळ स्वत:ची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलण्यातच धन्यता मानत असल्याचे स्पष्ट झाले. या कुणालाही नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी काहीएक देणे-घेणे नाही.
लोक कायदा हातात घेतील
बडीदर्गाह येथील दुर्घटनेला महावितरणचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. येथे संरक्षक जाळ्याही नाहीत. भविष्यात असा निष्काळजीपणा झाला तर, लोक कायदा हातात घेण्याची भीती आहे.
अयाज काझी, सामाजिक कार्यकर्ता
जाग येणार कधी?
गेल्या काही दिवसांपासून खडकाळी भागातील ट्रान्सफॉर्मरवर नियमित शॉर्टसर्किट होते. याबाबत अधिकार्‍यांना माहिती देऊनही लक्ष दिले जात नाही. महावितरणने आता तरी जागे व्हावे.
यासीन सय्यद, जखमींचे नातेवाईक
नियमित देखभाल व्हावी
घरापासून लांब व संरक्षक जाळ्या लावल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करू नये. पावसाळ्यात ट्रान्सफॉर्मरचा धोका वाढतो. महावितरणने नियमित देखभाल केल्यास दुर्घटना घडणार नाहीत.
सचिन चव्हाण, सिडको.