आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारसंघ बदलण्याचे अजित पवार यांना साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘भुजबळां’मुळे राष्ट्रवादीतील दावेदारी संपुष्टात आली आहे. दरम्यान, विधानसभेसाठी अपेक्षित मतदारसंघ नसल्याने जागावाटपाच्या वेळी शहरातील चार विधानसभा मतदारसंघांचा फेरविचार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘मराठा’ उमेदवाराशिवाय विजय अशक्य असल्याचा राजकीय निरीक्षकांचा ठाम विश्वास होता. मात्र, गेल्या निवडणुकीत समीर भुजबळांनी शिवसेना, मनसेचे उमेदवार दत्ता गायकवाड, हेमंत गोडसे यांचा पराभव करून तो चुकीचा ठरवला. त्यामुळे इतर उमेदवारदेखील येथून विजयी होऊ शकतो, याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. त्यातच पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार समीर भुजबळ यांनी शहर-जिल्ह्यात पक्षासह स्वत:ची ताकद वाढवली. विकासकामांमुळे लोकसभेसाठी आपली दावेदारी बळकट केली आहे. आता भुजबळांशिवाय राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होणे शक्य नसल्याची जाणीवदेखील भुजबळविरोधकांना झाली आहे. त्यामुळेच की काय, कालपर्यंत लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अर्धा डझन दावेदारांनी निवडणुकीपूर्वीच तलवारी म्यान केल्या आहेत. मात्र, त्याबदल्यात आपल्या महत्त्वाकांक्षा आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राजकीय दरवाजे खुले व्हावेत म्हणून शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

पंचवटीतून देवीदास पिंगळे व दिनकर आढावांना लढण्याची इच्छा आहे. मात्र, हा मतदार संघ काँग्रेसला सुटला असल्याने दोघांची गेल्या वेळी संधी हुकली. दोघांनी बंडखोरी केल्याने मतविभागणीचा फायदा मनसेला झाला. ती कटूता आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिष्टमंडळाने अजित पवारांच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला. आराखडा बैठकीमुळे अजित पवारांना त्यांचे गार्‍हाणे ऐकता आले नाही. मात्र, त्यांनी नेत्यांना नाराजही केले नाही व पुढच्या आठवड्यात दोन दिवसांच्या नाशिक मुक्कामी दौर्‍यात या विषयावर सविस्तर चर्चेचे आश्वासन दिले.

विधानसभेसाठी नेत्यांची ‘फिल्डिंग’
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून डावलले जाण्याची भीती अजित पवार सर्मथकांना वाटत आहे. पंचवटी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. मात्र, यंदा तेथूनच आमदारकीसाठी राष्ट्रवादीचे नेते देवीदास पिंगळे,व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, अविनाश अरिंगळे व दिनकर आढाव यांनी अजित पवार यांची भेट घेतली. जिल्हा नियोजन आराखडा बैठकीसाठी नाशिक दौर्‍यावर आलेल्या अजित पवारांना त्यांनी उमेदवारीसाठी साकडे घातले. लोकसभा नाही, तर किमान विधानसभेसाठी तरी जागावाटपाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.शहरातील चार विधानसभा मतदारसंघांतील देवळाली व सिडको राष्ट्रवादीकडे, तर पंचवटी व नाशिक मध्य काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आले आहेत. या जागावाटपाबाबत अदलाबदल झाल्यास शहरातील राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होईल, असा विश्वास त्यांनी पवार यांना दिला आहे.