आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Film Awards News In Marathi, Anjali Patil, Delhi In A Day, Divya Marathi

राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये नाशिकच्या अंजलीला स्पेशल ज्युरी अवॉर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘दिल्ली इन अ डे’, ‘चक्रव्यूह’ चित्रपट आठवताय. यातील नायिका अंजली पाटील ही नाशिकची आहे, हे अनेकांना माहीतही नाही. आज याच नाशिकच्या अंजलीने राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. ‘ना बंगेरू तल्ली’ या तमीळ चित्रपटासाठी तिला ‘स्पेशल ज्युरी अवॉर्ड’ जाहीर झाला आहे.


मराठी चित्रपटात वा नाट्यवतरुळात फारशी न अडकता अंजलीने थेट बॉलीवूड गाठले आणि एकामागोमाग एक विविध भाषांतील चित्रपटांत तिला संधी मिळाली. ‘ना बंगेरू तल्ली’ हा चित्रपटही त्यापैकीच एक. ‘ह्युमन ट्रॅफिकिंग’ या विषयाभोवती नाशिकच्या अंजलीला स्पेशल ज्युरी अवॉर्ड या चित्रपटाची कथा फिरते. यात अंजलीने मुख्य भूमिका केली आहे. याविषयी ती म्हणते, ‘पुरस्कार मिळाला अन् संपूर्ण चित्रपटाचे शेड्यूल्ड डोळ्यापुढून गेले. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. ते काम करताना खरं तर खूप त्रास झाला. आपल्याला काम करतानाच एवढा त्रास झाला तर यात अडकलेल्या मुलींना काय-काय सहन करावं लागत असेल, याची जाणीव होऊन आजही अंगावर शहारे येतात. आपण फक्त काम करतो आणि अवॉर्ड्स घेतो, पण त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती कशी होते, याची कल्पनाच केलेले बरी. दक्षिणेतील चित्रपट असल्याने थोडे अधिक कष्ट घ्यावे लागले. शिवाय भाषाही शिकायला लागली. चित्रपटात ते संवाद मीच बोलले आहे. पण, डबिंग मात्र दुसर्‍याने केले आहे. कारण शेवटी तमिळी टोन वेगळाच असतो. आज या सगळया कामाचे कौतुक झाले, चिज झाले म्हणून फार आनंद तर होतच आहे. पण, एक वेगळा विषय आम्ही लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकतो,’ याचाही आता विश्वास वाटत असल्याचे अंजली म्हणाली.


कोण आहे अंजली!
2011पासून खर्‍या अर्थाने चित्रपटात काम करणार्‍या अंजलीने आतापर्यंत हिंदी, तेलगू, सिंहला (श्रीलंकन), मल्याळम, कन्नडा, इंग्रजी आणि कोकणी या भाषेतील चित्रपटांत काम केले आहे. दिल्ली इन अ डे, ग्रीन बॅँगल्स, प्रथ्यायम्, ओबा नाथुवा, ओबा एक्का, चक्रव्यूह, एन्टे, ना बंगेरु तल्ली, अपना देश, श्री, किल द रेपिस्ट, फाइंडिंग फनी फर्नांडिस, विथ यू विदाऊट यू या चित्रपटांत तिने प्रमुख भूमिका केल्या आहेत. यापूर्वी तिला गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनयासाठी असलेला सिल्व्हर पिकॉक अवॉर्ड मिळाला आहे. तसेच ‘चक्रव्यूह’ चित्रपटासाठी स्टार डस्ट अवॉर्ड-2013, स्टार स्क्रीन अवॉर्ड, ‘दिल्ली इन अ डे’ चित्रपटातील भूमिकेसाठी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल तसेच साऊथ एशिया फिल्म फेस्टमध्ये तिला गौरविण्यात आले आहे.


अवॉर्ड ‘त्यांना’ सर्मपित
ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये अडकलेल्या मुलींचे जगणे असह्य असते. त्यामुळे मला मिळालेला देशातील हा प्रतिष्ठेचा हा अवॉर्ड मी त्यांना सर्मपित करत आहे. -अंजली पाटील, अभिनेत्री