आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Film Awards News In Marathi, Bela Shende, Marathi Film Industry

वाटा मोलाचा: पिता-पुत्राचा राष्ट्रीय पुरस्कारांत ‘रोल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय पाटील - Divya Marathi
अक्षय पाटील

नाशिक - राष्ट्रीय पुरस्कारांवर जशी मराठीची मोहोर उमटली, ती मोहोर उमटण्यामध्ये मोठा वाटा आहे तो नाशिकच्या कलाकारांचा. ‘तुह्या धर्म कोंचा’ या चित्रपटातील ‘खुर खुर कसाना मनमा..’ या गाण्यासाठी बेला शेंडेला पुरस्कार जाहीर झाला. तर, ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या दोन्ही चित्रपटांमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डॉ. सखाराम पाटील आणि त्यांचा मुलगा अक्षय पाटील यांच्या कर्तृत्वाचा ठसा या पुरस्कारांवर उमटला.


‘अहिराणी वैभव’चे 1250 कार्यक्रम करणारे डॉ. एस. के. पाटील हे खरेतर आयुर्वेद वैद्य विशारद आहेत. शेती सांभाळत त्यांनी काव्याचा छंद जोपासला आहे. गावगप्पा, विडंबन, मनोरंजन आणि प्रबोधन अशा चार माध्यमांतून ते हा कार्यक्रम करतात. ‘तुह्या धर्म कोंचा’ हा संपूर्ण चित्रपटच अहिराणी भाषेत आहे. दिग्दर्शक सतीश मन्वरला अहिराणी भाषेचे खूप आकर्षण म्हणूनच त्याने डॉक्टरांची मुलगी अभिव्यक्तीला या चित्रपटासाठी विचारले. तिने या चित्रपटातील संवाद लेखनाला मदत केली असून, एक छोटीशी भूमिकाही केली आहे. तिचे वडील कवी असल्याने त्याने त्यांना पाच गाणी लिहायला सांगितली. त्यांनी 20 लिहिली आणि एकाची निवड झाली. ते गाणं होतं..
खुर खुर कसानं मनमा.
पानी वाचीन बुडबुडा उठना.
येनी मा गुदगुल्या कसान्या.
तिन्ही सांजे अंबाडा सुटना..
बेलाने गायलेल्या याच गाण्यासाठी तिला पुरस्कार जाहीर झाला आहे. आदिवासी दांपत्य रानावनात सुखाने जगत असते. त्यातील ‘तिच्या’ नवर्‍याला शिकार केली नसतानाही खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते. तो तुरुंगात गेल्यावर तिच्या मनाची अवस्था हे गाणं व्यक्त करतं. तर, सध्या ‘माझे मन तुझे झाले..’ या मालिकेतील ‘तरंग अंतरीचे मनी गोठलेले, शब्द की आभास सदा साठलेले..’ हे लोकप्रिय गाणंही डॉ. पाटील यांनी लिहिलं आहे.


चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आजचा दिवस माझा’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले आहे ते डॉ. सखाराम पाटील यांचा मुलगा अक्षय पाटील याने. दिग्दर्शक अभिनयाची बाजू सांभाळतो, तर सहदिग्दर्शकाला कलाकारांपासून त्यांचे संवाद, कॉश्चूम, ते वेळेत येणे, जाणे अशा अनेक गोष्टींवर कसरत करावी लागते. ती कसरत अक्षयने केली. सचिन खेडेकर, अश्विनी भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एका मुख्यमंत्र्याची एका रात्रीची गोष्ट रंगविण्यात आली आहे. या चित्रपटात पत्रकाराची भूमिकाही त्याने केली. खूप मोठय़ा कलाकारांबरोबर काम करताना या क्षेत्रातील बारकावे कळत असल्याचे अक्षय प्रामाणिकपणे सांगतो. या चित्रपटाचे लेखन प्रशांत दळवी, अजित दळवी यांनी केले आहे. लेखनापासून ते या चित्रपटाशी संबंधित असल्याने काम करताना अवघड वाटले नसल्याचे मत त्याने व्यक्त केले.
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत काम केलेल्या अक्षयने एमसीएमए केले आहे. ‘भोपाल प्रेयर फॉर रेन’, ‘राज पिछले जनम का’, ‘द्वारकाधीश’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटांसह अनेक लघुपटांसाठीही त्याने दिग्दर्शन, सहदिग्दर्शन केले आहे. कुसुमाग्रजांच्या दोन पुस्तकांमधील 120 कवितांची दिग्गज कलाकारांच्या आवाजातील सीडीही त्याने केली. सध्या सुरू असलेल्या ‘दुर्वा’ आणि ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकांचे दिग्दर्शनही तो करत आहे.


‘तो’ माझ्यासाठी गोल्डन डे
बुधवार माझ्यासाठी गोल्डन डे होता. बाबांनी लिहिलेले गाणे, आणि मी सहदिग्दर्शित चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याने हुरूप वाढला. खरं तर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असे वाटलेच नव्हते. निर्मात्यांना ‘तुकाराम’साठी गेल्या वेळी अपेक्षा होत्या; मात्र ते होऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही हा चित्रपट कुठल्याही स्पर्धेत पाठवला नव्हता. पण, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने कामाची पावती मिळाली. अक्षय पाटील, सहदिग्दर्शक


शब्दांचा राष्ट्रीय सन्मान
आनंद झाला आहेच. आपण लिहिलेल्या शब्दांचा हा राष्ट्रीय सन्मान झाला आहे. शेतीच्या मातीवर प्रेम करणार्‍या एका सर्वसामान्य कवीच्या ओळींची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणं म्हणजे चांगल्या कलेला पुरस्कार निश्चित मिळू शकतो, असा विश्वास दृढ करणारीच ही घटना आहे. डॉ. सखाराम पाटील, गीतकार, ‘तुह्या धर्म कोंचा..