नाशिक- देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचा लाभ त्या-त्या राज्याला होत असतो. मात्र, संरक्षणादरम्यान सर्व संस्कृतीतून आलेले सैनिकच एकात्मता दाखवित देशाचे रक्षण करीत असतात. विविध राज्यातील तरुणांना एनसीसी आणि संरक्षण दलात एकजुटीचे दर्शन होत असल्याचे प्रतिपादन मेजर जनरल सुबोधकुमार यांनी केले.
एनसीसी मुंबई बी ग्रुप व 7 महाराष्ट्र बटालियन नाशिक यांच्या वतीने भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये 12 दिवसांच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात देशातील एकूण 577 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, त्यात महाराष्ट्रातील दोनशे विद्यार्थी आहेत. मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण सोहळा झाला. या वेळी महाराष्ट्राची लावणी, गुजरातचा गरबा, हरियाणा आणि पंजाबचा भांगडा, राजस्थानी नृत्य, उत्तराखंडची संस्कृती, कर्नाटकच्या विद्यार्थ्यांनी दाखविलेले दोरी उडीच्या कौशल्याने या सर्वांवर मात केली. दिल्ली येथे २६ जानेवारीला सुवर्णपदक प्राप्त केलेल्या महाराष्ट्रातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी
आपल्या लेजीम नृत्यांनी त्यांनी सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मुलांनी समूहनृत्य, गायन, वैयक्तिक नृत्य, वाद्य अशा विविध कला सादर केल्या.
सुबोधकुमार म्हणाले की, एनसीसीतील विद्यार्थ्यांनी दहा दिवसांचा अनुभव भविष्यात कायम गाठीशी ठेवावा. या वेळी रेणुका सुबोधकुमार यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कॅप्टन विष्णू उगले, कॅप्टन वसंत वडवर, चीफ ऑफिसर सतीश महाले, मेजर स्वाती कुलकर्णी, ग्रुप कॅप्टन जे. एस. लोहकना, कर्नल के. सी. उपाध्याय, कर्नल प्रवीण विक्रम, सुभेदार मेजर बी. पर्वत, सुभेदार महादेव गायकवाड, सुभेदार प्रभाकर काळे, राजेंद्र सिंग, अरविंद जगताप आदींनी नियोजन केले होते.