आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात नैसर्गिक स्रोतांचा होतोय संकोच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या शहरीकरणामुळे नाशिकचा चौफेर विस्तार, विकास होत असतानाच नैसर्गिक नाल्यांवरदेखील काही बांधकाम व्यावसायिकांची वक्रदृष्टी पडल्याने या नाल्यांवरही पक्के बांधकामे उभे राहू लागले आहेत. काही नाल्यांमध्ये सर्रासपणे दररोज डंपरद्वारे माती टाकून नाले बुजविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. या नैसर्गिक नाल्यांचा संकोच होत असून, मुंबईच्या मिठी नदीमुळे निर्माण झालेल्या भीषण अशा पूरपरिस्थितीनंतरही महानगरांमधील नाल्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. डीबीस्टारचा यावर प्रकाशझोत..

नाशिक शहरातून गोदावरी नदी वाहते. शहर व परिसरातील सर्व नाल्यांतील पाणी पावसाळ्यात नदीच्या मुख्य प्रवाहात येऊन मिसळते. आता हेच नाले बुजवण्याचा घाट घातला जात असल्याने भविष्यात शहराला भीषण पूरपरिस्थितीचा सामना करावा लागण्याची भीती तज्ज्ञांतर्फे व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी हे नैसर्गिक नाले बुजवण्याचा घाट घातलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांनी दिले होते.

गोदावरीने सांडपाणी आणि पाणवेलींमुळे धोकेदायक पातळी गाठली आहे. गोदावरी प्रदूषणाच्या विषयावरून सामाजिक संघटनांकडून आंदोलने केली जात असून, त्याची दखल उच्च न्यायालयाने घेत मनपा आणि पोलिस प्रशासनास फटकारत विशेष बंदोबस्त नियुक्तीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, नैसर्गिक नाले बुजवून त्याची जागा घशात घालण्याचा डाव रचला जात आहे. गोदावरी प्रदूषणापाठोपाठ नैसर्गिक नाल्यांवरील वाढते अतिक्रमण आणि नाले बुजविणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी संघटनांना आंदोलने करावे लागण्याची आवश्यकता निर्माण होत आहे.

शिळफाट्यावरील इमारत दुर्घटना

मागील आठवड्यात ठाणे येथील शिळफाट्यावर इमारत कोसळून निष्पाप 75 हून अधिक नागरिकांचा बळी गेला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली जात असताना, ही इमारतदेखील नैसर्गिक नाल्याचा संकोच करूनच उभारण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. नाल्यांवरील बांधकाम किती धोकेदायक आहे, हे यावरूनच दिसून येते.

या नाल्यांत भरली जातेय माती

कृषीनगर जॉगिंग ट्रॅकसमोर पाटबंधारे विभागाच्या उपकार्यालयाला लागून असलेल्या नैसर्गिक नाल्यात काही व्यावसायिक, खासगी ठेकेदारांकडून माती टाकण्यात येत आहे. या ठिकाणी रस्त्याची उंची वाढून टेकडी निर्माण झाली आहे. याबाबत महापालिका, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने संशय निर्माण होत आहे. यामुळे नाल्याचे पात्र कमी होऊन संकोच होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तिडके कॉलनीतील नाला, संत आसारामबापू आर्शमानजीकचा नाला, सिटी सेंटर मॉलच्या मागे नासर्डी नाल्याच्या दुतर्फा उंटवाडीपर्यंत, सिडकोतील अंबड-लिंक रोडवरील डीजीपीनगर, मीनाताई ठाकरे शाळेलगतचा नाला आणि मोगलनगर, खुटवडनगर नाला, मुंबई नाक्यावरील किनारा हॉटेलच्या मागील बाजूस व मोटकरवाडीजवळ नाल्याजवळ माती टाकली जात आहे.

जागा बळकावण्याचा घाट

नैसर्गिक नाल्यांवर मातीचा भराव टाकल्यानंतर जागेचे सपाटीकरण केले जात असून, काही दिवसांतच राजकीय नेत्याच्या आर्शयाने फलक लागून इमारती उभ्या राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या जागांवर महापालिकेकडून बांधकामाला कशी परवानगी मिळाली? असे प्रश्न अनुत्तरीत राहत असून, लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांच्या वरदहस्ताने नैसर्गिक नाल्यांमध्ये माती टाकून बांधकाम व्यावसायिक बनण्याचा मान प्राप्त केला जात आहे. सद्यस्थितीत उंटवाडी परिसरातील नाला असो की गोविंदनगर, सदगुरूनगर भागातील नाल्यांचा संकोच करून उभ्या राहत असलेल्या इमारतींवरून दिसून येते.
तपमानात झाला बदल

4राजीव गांधी भवनासमोर, कॉलेजरोडवर सागर स्वीटमार्टच्या बाजूला, गंगापूररोड, सिडकोसह भागात ठिकठिकाणी नैसर्गिक नाले होते. या नाल्यांवर बांधकामे झाल्याने नैसर्गिक स्रोत बंद झाले आहेत. या ठिकाणी उभ्या राहिलेल्या बांधकामांच्या ठिकाणी पावसाळ्यात समस्या निर्माण होते. पाण्याचा निचरा होत नसल्याने इमारतीत ओलावा राहत आहे. नाशकातील नैसर्गिक नाले बुजविले जात असल्याने वीस वर्षांपूर्वी उन्हाळ्यातही दिवसभर थंड झुळूक वाहत असायची. आता थंड वातावरण नाहीसे झाले आहे.
प्रा. सूर्यकांत रहाळकर
हे नाले मिळतात गोदावरीला
गंगापूर गावापासून होळकर पुलापर्यंत मल्हारखान नाला, जोशीवाडा नाला, चोपडा लॉन्सजवळील नाला, देह मंदिर सोसायटीजवळील नाला, चव्हाण कॉलनीजवळील नाला, सुयोजित गार्डनजवळील नाला, आसारामबापू आर्शमाजवळील नाला, आनंदवल्ली नाला, चिखली नाला, सोमेश्वर नाला, रामवाडीजवळील लेंडी नाला, याचबरोबर सरस्वती, कपिला या छोट्या नद्या मिळतात.
माती टाकल्याने होते पर्यावरणाची हानी
नैसर्गिक नाले नदीला जाऊन मिळत असल्याने त्यांचा संकोच झाल्यास पर्यावरणास हानी पोहोचते. नाले प्रवाही राहिल्यास त्यात मासे व जलचर प्राण्यांचा वावर राहतो. शेवाळ निर्माण झाल्यास पाणी स्वच्छ राहण्यास मदत होऊन वनस्पतींची वाढ होत असते. त्यामुळे नाल्यांमध्ये माती टाकून ते बुजविल्यास प्राणी, वनस्पती नष्ट होण्याची भीती आहे. नाले प्रवाहित ठेवण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न केले पाहिजे.
प्रा. डॉ. पंकज वाणी, पर्यावरण विज्ञानतज्ज्ञ
नैसर्गिक नाले बुजविणे घातकच
नैसर्गिक नाल्यांचा संकोच करणे घातक असून, भविष्यात नाशिकंमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन मुंबईसारखा धोका निर्माण होऊ शकतो. महापालिकेने कठोर कारवाई केली पाहिजे. महापालिकेच्या बांधकाम, नगररचना विभागाकडे पत्रव्यवहार करून नाले बुजविण्याचे प्रकार लक्षात आणून दिले आहेत. मात्र, मनपाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
अ. ना. म्हस्के, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
झाडांवर कुर्‍हाड

नैसर्गिक नाल्यांच्या लगत ज्या ठिकाणी मातीचे भराव टाकले जात आहेत, त्या ठिकाणी असलेली झाडे सर्रास तोडली जात आहेत. माती टाकणार्‍यांकडून रात्रीतून झाडी-झुडपे जाळून जागेचे सपाटीकरण केले जाते. काही ठिकाणी पार्किंगसाठी त्याचा वापर केला जात आहे. कृषीनगर जॉगिंग ट्रॅकसमोरील नाला बुजवून सपाटीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. त्याकडे महापालिका व पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने दुर्लक्ष केले. या नाल्यात मातीसह सीमेंट, दगड, बांधकाम साहित्य टाकून नाले बुजविण्याचा गोरखधंदा सुरू आहे. याबाबत मात्र मनपा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.
थेट प्रश्‍न
संजय घुगे,
नगररचना विभाग अधिकारी,
महानगरपालिका
0 महापालिकेच्या दप्तरी नैसर्गिक नाल्यांची संख्या किती?

महापालिकेकडे अशी कुठलीही नाल्यांची निश्चित संख्या नसून, ढोबळ मनाने 20 ते 25 नाले नैसर्गिक असू शकतात.

0 नैसर्गिक नाल्यांचा स्रोत संकोच केला जात आहे का?

मुळात नैसर्गिक नाले म्हणायचे कोणाला, असा प्रश्न यंत्रणेला असून, शहरात नागरी वसाहती वाढत असल्याने खड्डय़ाचा अथवा सखल भाग असेल, तर त्यासही काहीजण नाले म्हणतात. पण ज्या नाल्यांचा प्रवाह थेट गोदावरी नदीत मिसळतो, अशा नैसर्गिक नाल्यांचा स्रोत संकोच केल्याच्या काही घटना पुढे आल्या आहेत.

0 नाल्यांवर बांधकामे करणार्‍या अथवा नाले बुजविणार्‍यांवर कारवाई काय?

नैसर्गिक नाल्यांवर भराव टाकून बांधकाम करण्याचा प्रकार लक्षात येताच कायदेशीर नोटिशी बजाविल्या जातात. त्याचप्रमाणे संबंधितांकडून नाले उकरून त्याचा संकोच दूर केला जातो. सातपूर येथील शिवाजीनगर, सिडकोत तीन ठिकाणी नाले पूर्ववत करण्यात आले आहे.

0 बांधकामांना परवानगी देतात का?

नाल्यांवरच्या बांधकामांना परवानगी दिली जात नाही. याउलट नगररचना विभाग असो की इतर भुयारी गटार योजना, बांधकाम विभागामार्फत वेगवेगळ्या नोटीस देऊन संबंधितांवर कारवाई केली जाते.