आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतपत्रिका पत्रपेटीत आढळल्याने ‘संशयकल्लोळ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अ. भा. नाट्य परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी एक दिवसावर आली असताना, अखेरपर्यंत मतपत्रिकांचे राजकारण सुरूच होते. शनिवारी दुपारी कालिदास कलामंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील फलकावर लावलेल्या पत्रपेटीत पोस्टाचे शिक्के असलेल्या मतपत्रिका आढळल्या. ‘कालिदास’च्या दुसर्‍या मजल्यावर नाट्य परिषदेच्या कार्यालयाजवळील मतपेटीत त्या न टाकता पत्रपेटीत कशासाठी टाकल्या, यावरून दिवसभर उमेदवार व निवडणूक अधिकार्‍यांत वाद सुरू होता.

मतमोजणी गंगापूररोडवरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात रविवारी रात्री 8.30 वाजता होणार आहे. कालिदासच्या प्रवेशद्वारावरील फलकावर ‘मतपत्रिका तेथील पत्रपेटीत न टाकता दुसर्‍या मजल्यावरील मतपेटीत टाकाव्यात,’ अशी सूचना निवडणूक अधिकार्‍यांनी चिकटवली होती. तरीही पत्रपेटीतच मतपत्रिका टाकल्याचे निदर्शनास आले. मतपत्रिका नेमक्या जातात कुठे, यावर लक्ष ठेवण्यासाठी आपली माणसे ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे. एका पॅनलचे उमेदवार व कार्यकर्ते विरोधी पॅनलच्या मतपत्रिका पत्रपेटीतून काढून नष्ट करतात, असे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पत्रपेटीची चावी नाट्य परिषदेकडे असल्याने सध्या पदावर असलेल्या उमेदवारांना ती सहज उपलब्ध होते व त्यातून असे गैरप्रकार होत आहेत, असाही आक्षेप घेण्यात आला. दरम्यान, स्थानिक निवडणूक अधिकारी विनायक रानडे यांनी पत्रपेटीतून मतपत्रिका ताब्यात घेतल्या व मतपेटीत टाकण्याची व्यवस्था केली.

उमेदवारच करतात मतपत्रिका गायब
निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या दोन्ही पॅनलनी आपापला मतदारवर्ग तयार केला आहे. त्यामुळे विरोधातील मतपत्रिका मतदारांच्या घरी पोहचूच द्यायच्या नाहीत किंवा मधल्यामध्येच गहाळ करायच्या असे प्रकार होत असल्याचेही काही मतदारांनी सांगितले. पत्रपेटीतून आतापर्यंत 50 ते 70 मतपत्रिका गायब झाल्याची शंका व्यक्त होत आहे.