आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक नाटकासाठी नाट्यपरिषदेचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकच्या कलाकारांना घेऊन, नाशिकच्याच लेखक व दिग्दर्शकांच्या सहकार्याने येत्या सहा महिन्यांत दिवंगत दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या स्मरणार्थ व्यावसायिक नाटकाची निर्मिती करण्यासाठी नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी समन्वयन करण्याची जबाबदारीही नाट्यपरिषदेने उचलली आहे. मात्र, निर्मात्यांची शोधाशोध येथील कलाकार व दिग्दर्शकांना करावी लागणार आहे, ज्यासाठीची मदत नाट्यपरिषद करणार असल्याची ग्वाही मध्यवर्ती नाट्यपरिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी कालिदास येथील परिषदेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत दिली.

या वेळी करंजीकर यांनी नाशिकमध्ये किमान दोन व्यावसायिक नाटके होऊ शकतात एवढी क्षमता असूनही, ते न होण्यामागे कोणत्या अडचणी आहेत याचा उपस्थित रंगकर्मींकडून आढावा घेतला. त्यावर करंजीकर यांनी नाट्यपरिषदेतर्फे सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. परिषदेतील अरुण काकडेंसारख्या ज्येष्ठ मान्यवरांच्या माध्यमातून महाराष्ट्राबाहेरही नाशिकच्या नाटकाचा प्रयोग करता येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या वेळी नाट्यपरिषदेचे सुनील ढगे, रवींद्र कदम, रवींद्र ढवळे, अध्यक्ष नेताजी भोईर, लक्ष्मण सावजी, विवेक गरुड, राजेंद्र जाधव, दत्ता पाटील, धनंजय वाबळे, राजेश शर्मा, दिनेश चौधरी, रघुनाथ फडणीस आदी रंगकर्मी उपस्थित होते.

हे ठरतात अडसर
शहरातील कलाकारांची तीन ते चार प्रयोगांनंतर एखाद्या नाटकास कमिटमेंट नसते, त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो, शिवाय निर्मात्यांची लेखकाच्या लेखनामधील ढवळाढवळ टाळता येण्यासारखी नसते, अनेकदा चांगले निर्माते मिळत नाहीत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या मार्केटिंग टीमची गरज, असे अनेक मुद्दे उपस्थित रंगकर्मींनी मांडले.

नाशिकचीही नाटके विका
या वेळी उपस्थित राजेंद्र जाधव यांनी वर्षभरात नाशिकबाहेरची म्हणजे पुण्या-मुंबईची तब्बल 125 नाटके विकतो, असे सांगताच दत्ता पाटील यांनी नाशिकचीही नाटके विका, असे आवाहन केले. तसेच राज्य नाट्यच्या प्रभावातून बाहेर पडत एका सक्षम व्यावसायिक नाटकाची निर्मिती करणे गरजेचे असल्याचेही या वेळी मत मांडले गेले.