आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Navigation And Management System Is Importants In Simhastha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेव्हिगेशन अॅण्ड मॅनेजमेंट सिस्टिम सिंहस्थात महत्त्वाची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यातील गर्दीत जर कोणी हरवले, तर त्याचा तत्काळ शोध घेऊ शकणाऱ्या आणि आपत्तीच्या वेळी तत्काळ सूचना देणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी बेस्ड नेव्हिगेशन अॅण्ड मॅनेजमेंट सिस्टिम फॉर कुंभ या संशोधन प्रकल्पाची एनईएसतर्फे इनोव्हेटिव्ह प्रकल्प म्हणून निवड झाली असून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
संदीप फाउंडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च सेंटर या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अमित राऊत, अजय शर्मा पंकज धोंडे यांनी रेडिओ फ्रिक्वेन्सी बेस्ड नेव्हिगेशन अॅण्ड मॅनेजमेंट सिस्टिम फॉर कुंभ हा संशोधन प्रकल्प तयार केला आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात नटराजन एज्युकेशन सोसयटीतर्फे एनईएस इनोव्हेशन अवॉर्डस २०१५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मॅनेजमेंट सिस्टिम फॉर कुंभ या प्रकल्पाची इनोव्हेटिव्ह प्रकल्प म्हणून निवड झाली असून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर एनईएसचे संस्थापक डॉ. गणेश नटराजन यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पासाठी विभागप्रमुख अमितकुमार मानेकर, प्रकल्प समन्वयक अमोल पोटंगवार, प्रा. संदीप वाळुंज यांचे मार्गदर्शन लाभले.
असा आहे प्रकल्प
कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक पंचवटी येथे येतात. गर्दीमुळे अनेक जण मार्ग चुकतात. हरवलेल्या भाविकांचा शोध घेण्यासाठी आरएफआयटी अर्थात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडिफिकेशनद्वारे सदरच्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करणे शक्य होणार आहे. मुख्य सर्व्हरला माहिती संकलित झाल्यानंतर तात्काळ त्या व्यक्तीला मदत करता येणार असून, आपत्तीच्या वेळीही तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल.
राज्यातून एक हजार प्रकल्प
अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध नावीन्यपूर्ण प्रकल्पांना याेग्य व्यासपीठ मिळावे, या प्रमुख उद्देशाने एनईएसतर्फे दरवर्षी राज्यभरातील संशोधनपर प्रकल्पांची निवड केली जाते. यावर्षी तब्बल एक हजार प्रकल्पांनी एनईएसच्या इनोव्हेटिव्ह स्पर्धेत सहभाग घेतला होता. या प्रकल्पांतून एकूण ४० प्रकल्पांची निवड झाली असून, त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.