आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नवश्या’ची दानपेटी उघडण्यास टाळाटाळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारे देवस्थान म्हणून परिचित असलेल्या आनंदवल्लीतील नवश्या गणपती मंदिराची दानपेटी निरीक्षकांच्या समक्ष दर दोन महिन्यांनी उघडून त्याची मोजदाद करण्याचे आदेश असतानाही त्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबत सचिवांनी सहधर्मदाय आयुक्तांना निवेदन सादर करून त्याच्या नियमित तपासणीची मागणी केली आहे.
नवश्या गणपती मंदिराच्या अध्यक्षांकडून मनमानी कारभार व गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी आनंदवल्लीतील ग्रामस्थ व काही विश्वस्तांनी सहधर्मदाय आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत धर्मदाय उपआयुक्त कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत दानपेट्या मोहोरबंद करण्यात आल्या.
तसेच निरीक्षकांच्या समक्ष दर दोन महिन्याला अध्यक्ष, विश्वस्तांकडून ग्रामस्थांच्या उपस्थितीत दानपेट्या उघडून त्यातील दानाची मोजणी करण्यात येत होती. गेल्या वर्षी दहा महिन्यापर्यंत झालेल्या मोजणीत सुमारे 16 लाखांची रोकड व दागिने प्राप्त झाले होते. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांपासून विश्वस्तांकडून दानपेट्या उघडण्यात आलेल्या नाहीत. शिवाय, ट्रस्टच्या खात्यातील मोठ्या रकमाही विनापरवाना काढण्यात आल्याचे सचिव अरुण गलांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
गैरव्यवहार झालेला नाही - ट्रस्टचे कामकाज सहधर्मदाय आयुक्तालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. ट्रस्टच्या खात्यातून जी मोठी रक्कम काढण्यात आली आहे, ती मंदिरात दागिन्यांची जी आकर्षक सजावट करण्यात आली, त्याबदलत्यात नाशकातील सराफी पेढीला देण्यात आली आहे. त्याच्या पावत्याही आपल्याकडे असून, कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. निरीक्षकांना वेळ मिळत नसल्याने दानपेटी उघडण्यात विलंब होत आहे. - राजेंद्र जाधव, अध्यक्ष, नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट