आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रशासनाला सिलिंडर भेट, सव्वादोनशे रुपयांची वाढ झाल्याचा निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या तीन महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात सव्वादोनशे रुपयांनी वाढ झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी (दि. १) जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर सिलिंडर भेट आंदोलन केले. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले असल्याची टीका यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 
 
पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, ग्राहकांना अाता १४.२ किलोचे सिलिंडर तब्बल ७३८.५० रुपयांना घ्यावे लागणार अाहे. गॅस सिलिंडरच्या दरावरील थेट नियंत्रण शासनाने कमी केल्याने नोव्हेंबरपासून घरगुती सिलिंडरच्या दरात ९५ रुपयांनी वाढ झाली आहे. ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘सिलिंडर दरवाढ कमी करा’, ‘झालेली दरवाढ मागे घेतलीच पाहिजे’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. 
 
गॅस सिलिंडरच्या किमतीबाबतचे पूर्ण अधिकार शासनाने आता गॅस कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दर पंधरा दिवसांनी बदलणाऱ्या किमतीप्रमाणेच सिलिंडरचे दरही दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलत आहेत. परंतु, ते कमी होण्याऐवजी दरमहा वाढत आहेत. त्यानुसार नोव्हेंबरला जवळपास ९५ रुपयांची दरवाढ झाली आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अालेल्या निवेदनात म्हटले अाहे की, एकीकडे सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने सामान्य जनतेला सिलिंडरशिवाय पर्याय नाही. काळ्या बाजारात मिळणारे रॉकेल जवळपास ७० रुपये प्रतिलिटर पोहचले अाहे. त्यातच आता दरमहा सिलिंडरची दरवाढ होत असल्याने जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. ही दरवाढ रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करण्याची आणि होणारी दरवाढ नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात अाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आणलेले गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले. आंदोलनात शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले, महापालिका गटनेते गजानन शेलार, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, शहर सरचिटणीस संजय खैरनार, महेश भामरे, सुरेश आव्हाड, संजय बोडके, अॅड. चिन्मय गाढे, अनिता भामरे, सुषमा पगारे, समीना मेमन, अनिल जोंधळे, बाळासाहेब गिते आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...