आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेध निवडणुकीचे: नाशिक-दिंडोरी राष्ट्रवादीकडे तरी कॉँग्रेसची चाचपणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी हे दोघेही लोकसभा मतदारसंघ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला असतानाही कॉँग्रेस पक्षर्शेष्ठींकडून या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. यासाठी ज्येष्ठ नेते तथा वनमंत्री पतंगराव कदम यांच्यासह प्रभारी आमदार भाई जगताप नाशकात बैठक घेत असल्याने आघाडीच्या जागांमध्ये फेरबदलाची चर्चा सुरू झाली. मात्र, कॉँग्रेसला या दोघींपैकी एकही जागा मिळण्याची शक्यता नसतानाही पक्षर्शेष्ठींची बैठक हा केवळ फार्स ठरणार अशी शक्यता खुद्द स्थानिक पदाधिकार्‍यांकडूनच वतविण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्तांचा मेळावा शनिवारी कॉँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला वनमंत्री पतंगराव कदम, नवनियुक्त प्रभारी भाई जगताप, सचिन साठे, जिल्ह्यातील पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर नाशिक-दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची चाचपणीदेखील केली जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात हे दोनही मतदारसंघ गेल्या दोन ते तीन लोकसभा निवडणुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवाराने लढविल्या आहेत. यापैकी दिंडोरी मतदारसंघात भाजपचा, तर नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाला आहे.

नाशिकच्या जागेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिले असताना ही जागा कॉँग्रेसला मिळणे अशक्यच आहे. त्यातही गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच वर्चस्व असताना कॉँग्रेसकडून कोणत्या आधारावर या जागेवर दावा सांगितला जात आहे, असा देखील पदाधिकार्‍यांकडूनच प्रश्न उपस्थित होत आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही कॉँग्रेसचा केवळ एकच आमदार असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तीन-तीन आमदार, नगरपालिका, जिल्हा परिषदेत वर्चस्व असल्यानेही बारामतीनंतर सर्वात सुरक्षित असा मतदारसंघ म्हणून राष्ट्रवादीकडून दावा केला जातो. या एकूणच पार्श्वभूमीवर शनिवारी होणारा मेळावा हा निव्वळ औपचारिकता ठरतो की पालकमंत्री भुजबळांचे लक्ष वेधण्यासाठी अशी चर्चा सुरू झाली आहे.