आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळवणमध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण - कळवणच्या राजकारणाचे सूत्र फिरवण्याची क्षमता असणारा गट म्हणून कनाशी गटाला या वेळी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 50 टक्के महिला आरक्षणामुळे सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे येथील असंख्य इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यातच 90 टक्के आदिवासी मतदार असणा-या या गटात 2002चा अपवाद वगळता सुरुवातीपासून कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, आमदार पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध कॉँग्रेस अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या वेळी खुला झालेल्या या गटातून विद्यमान सदस्य शैलेश पवार यांनी पाहुणा कलाकर म्हणून कॉँग्रेसची उमेदवारी करत राष्ट्रवादी व आमदार गटाला शह देत इतिहास घडवताना कॉँग्रेसला हक्काची जागा परत मिळवून दिली होती. मात्र, या वेळी आमदार पवारांची स्नुषा जयश्री पवार या राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळे येथे कुणी पाहुणी कलाकार उतरण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, याच गटातील जया खांडवी, चंद्रकला गांगुर्डे व छाया गायकवाड या जयश्री पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करतील, अशी चर्चा आहे. त्यातच आमदार पवार यांच्या गावातील दळवट सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पवारांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या गटातून तयारी करणा-या जयश्री पवार कनाशी गटातील बापखेडा गणाच्या विद्यमान सदस्या आहेत. त्यातच कर्तव्यदक्षपणे पंचायत समितीत छोटे, मोठे काम करण्याची चांगली पद्धत, बचतगटांच्या माध्यमातून महिलांशी असणारा मोठा जनसंपर्क, बापखेडा गटात केलेली विकासकामे या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू असल्यामुळे त्यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित धरली जात आहे. शिवाय त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून खेड्या-पाड्यांवर विविध विकासकामांच्या निमित्ताने मतदारांच्या घेतलेल्या गाठीभेटीमुळे त्या इतर इच्छुकांपेक्षा प्रचारात काहीअंशी पुढे आहेत. मात्र, मातब्बरही मागे नाहीत. त्यातच निशाणी पंजा व पंजा म्हणजे इंदिरा गांधी असे मानणा-या या पश्चिम पट्ट्यात कॉँग्रेसची ताकद पाहता जयश्री पवारांना विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. त्यातच पवारांनी प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची रंगीत तालीम असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.
येथे सेना-भाजप युतीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे दोन्ही कॉँग्रेसच्या उमेदवारांना रान मोकळे असेल. मात्र, दोन्ही कॉँग्रेसकडे नाराज होणा-यांपैकी एखादा उमेदवार युतीच्या गळाला लागला तर तो दोन्ही कॉँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो व त्याच संधीच्या शोधात असलेल्या युतीने या गटात आपला वेग संथ केल्याची चर्चा युतीच्या गोटात आहे. माकपकडून स्वत:च्या अस्तित्वासाठी या गटात उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. थोडक्यात, अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संधीच्या शोधात असलेल्या युती व इतरांपेक्षा या गटात मुख्य लढत ही दोन्ही कॉँग्रेसमध्येच होणार हे नक्की. या गटात मीनाक्षी पवार, जयमाला खांडवी, भीमाताई बागुल, ज्योती जाधव, लक्ष्मीबाई जगताप, चंद्रकला गांगुर्डे यांच्या नावांचीही चर्चा आहे.