आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीकडून एका दगडात.. दोन पक्षी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिन्नर विकास आघाडीतील शिवसेना व कॉँग्रेसच्या तत्कालीन पदाधिकार्‍यांना राष्ट्रवादीच्या तंबूत खेचण्याची खेळी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खेळली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पटलावरील कॉँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादीमधील शीतयुद्ध पुन्हा एकदा सामोरे आले आहे. सिन्नरमधील मातब्बरांच्या प्रवेश सोहळ्यानिमित्त कॉँग्रेसवर कुरघोडी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे की, यातून आमदार कोकाटे यांना शह देण्याचा डाव खेळला जात आहे याविषयी चर्चा रंगू लागली आहे.
नगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकही दोन्ही कॉँग्रेस स्वबळावर लढत असून, प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना, भाजप नव्हे तर एकमेकांशीच दोन हात करण्याची वेळ कॉँग्रेस व राष्ट्रवादीवर आली आहे. शिवसेनेचे विधानसभेतील पराभूत उमेदवार प्रकाश वाजे, युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय सांगळे आणि माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असून, या निमित्ताने कोकाटे यांना शह देण्याविषयीच्याही गप्पा रंगत आहे. प्रकाश वाजे यांनी विधानसभा निवडणुकीत कोकाटेंशी दोन हात केले. भविष्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव राजाभाऊ वाजे यांची उमेदवारीची मनीषा असल्यामुळे राष्ट्रवादीत प्रकाश वाजे डेरेदाखल झाल्याचे बोलले जाते. उदय सांगळे हे पंचायत समिती निवडणुकीत चास गणातून इच्छुक आहेत. दिघोळे यांनाही राजकीय पुनर्वसनासाठी राष्ट्रवादीचा आधार घ्यावा लागल्याची चर्चा आहे.
शहरात मैत्री; ग्रामीणमध्ये दोन ‘हात’ - महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचे निश्चित केले आहे. मात्र, ग्रामीणमध्ये दोन्ही कॉँग्रेस स्वबळावर लढत आहे. शहरी मतदारसंघावर शिवसेना व भाजपचा पगडा असून, त्यातच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुसंडी मारत स्वत:चे साम्राज्य निर्माण केले आहे. त्यामुळे एकमेकांशी दोन हात करण्यापेक्षा एकत्र जागा लढवून सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने शहरात कॉँग्रेस आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रमुख पाहुण्यांकडे ‘लक्ष’ - नगरपालिका निवडणुकीनिमित्त छगन भुजबळ आणि कोकाटे यांच्यात, तर उपमुख्यमंत्रिपदावरून छगन भुजबळ व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजित पवार यांच्यात निर्माण झालेली दरी किंबहुना राजकीय वैर सर्वर्शुत आहे. या पार्श्वभूमीवरील सिन्नरमधील पक्षप्रवेश सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे येणार नसल्याचे वृत्त असल्याने प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत अजित पवार असणार आहेत. त्यामुळे अजितदादा व छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर कशी टोलेबाजी करतात, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.