आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी युवकांचा नाशकात धिंगाणा; महापालिकेतील सुरक्षारक्षकांशी झटापट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील विविध समस्यांसह गंजमाळ येथील घरकुल योजनेतील दिरंगाईकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने बुधवारी महापालिकेवर काढलेल्या मोर्चानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी कमालीच्या असभ्यपणाचे प्रदर्शन केले. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाखाली आयुक्तांच्या कार्यालयात सुमारे पाऊण तास पोलिसांच्या साक्षीने गोंधळ व धिंगाणा सुरू होता.

रस्त्यांची दुरवस्था, गोदावरीचे प्रदूषण यांसह विविध समस्या सोडवण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याचा आक्षेप घेत रायुकॉँचे शहराध्यक्ष छबू नागरे यांच्या अध्यक्षतेखाली काढलेल्या या मोर्चात दोन-अडीच हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. शालिमार, सीबीएसमार्गे गेलेला हा मोर्चा राजीव गांधी भवनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच अडवण्यात आला. कार्यकर्त्यांनी प्रशासन व मनसेविरुद्ध घोषणाबाजी केली. प्रवेशद्वारावरील बंदी झुगारत नागरे यांच्यासह वैभव देवरे, हरिभाऊ येवले, दत्ता लासुरे व काही महिला कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. आयुक्तांच्या कक्षाबाहेर सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे व त्यांचे सहकारी तेथे असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आयुक्त कार्यालयाचा दरवाजा ढकलत आत प्रवेश मिळविला. सुरक्षारक्षकांशी कार्यकर्त्यांची झटापटही झाली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. कार्यकर्ते नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून आणखी पोलिस बोलाविण्यात येऊन सहायक आयुक्त गणेश शिंदे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर आयुक्तांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींना दालनात बोलावून घेत महिन्याभरात घरकुलाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

अन् कार्यकर्ता ‘बिघडला’
आयुक्त दालनाचे शिपाई रवी पवार अधिकार्‍यांकडून आदेश येत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांना आत जाण्यास मज्जाव करत कर्तव्य बजावत होते. नागरे यांची समजूत घालताना ‘छबुभाऊ तुम्ही समजून घ्या,’ असे ते सांगत असतानाच एका कार्यकर्त्याने आमच्या नेत्याचे एकेरी नाव घेऊन अपमान करतो का, असे दरडावत थेट शिवीगाळ सुरू केली. ‘आमच्या नेत्यासाठी आम्ही जीव देऊ, केस झाली तरी बेहत्तर,’ असे तावातावाने ओरडत या कार्यकर्त्याने 15-20 मिनिटे असभ्य भाषेचा वापर केला. पोलिसांनी या प्रकाराकडे निमूटपणे पाहात ‘शांत राहा’, अशी संयमाची भूमिका घेतली.

मोर्चेकर्‍यांनी केल्या अशा मागण्या
भीमवाडी घरकुल योजनेअंतर्गत 480 घरे देण्याचे कबूल केल्यानंतर 200 कुटुंबीयांची पर्यायी निवास व्यवस्था करणे बंधनकारक असताना कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सत्ताधारी व प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. घरकुल योजनेसह पावसाळी गटार योजनेतील भ्रष्टाचार अहवाल जाहीर करावा. डास निर्मूलन मोहीम राबवावी. श्वान निर्बीजीकरणातील गैरप्रकार रोखावा. रस्ते-उद्यानांची दुरुस्ती करावी. अतिक्रमण हटवावीत. पार्किंगची व्यवस्था करावी.

कर्मचारी-अधिकार्‍यांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ
‘आयुक्तांची खातेप्रमुखांसोबत बैठक सुरू असल्याने संबंधित अधिकार्‍यास भेटून माहिती द्यावी,’ असा निरोप शिपायाकरवी आल्यानंतर आधीच माथे भडकलेल्या कार्यकर्त्यांनी कर्मचारी-अधिकार्‍यांच्या माता-भगिनींचा उद्धार करत शिवीगाळ केली.