आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण : वारा अन् इशारा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक मतदारसंघात गो. ह. देशपांडे यांच्यानंतर केवळ समीर भुजबळ यांच्याच कार्यकाळात एवढी कामे झाल्याचे साक्षात शरद पवारांनी जाहीरपणे दिलेले प्रशस्तिपत्र हेच नाशिक येथील राष्ट्रवादीच्या मंगळवारच्या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नाशिकमधून यंदा छगन भुजबळ स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार की समीरच पुन्हा लढणार, या चर्चेला गेल्या काही दिवसांत चांगलेच उधाण आले असताना, त्यातील ‘सस्पेन्स’ थेट उलगडण्याऐवजी आपल्या राजकीय ख्यातीला अनुसरून पवारांनी जाता जाता केलेला हा इशारा बरेच काही सांगून गेला. वास्तविक, सहा महिन्यांपूर्वी नाशकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी अशाच प्रकारे इशारों इशारों में पवारांनी केलेले वक्तव्यच या चर्चेचा धुरळा उडण्यास कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सातत्याने याबाबतीत वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पवार मंगळवारच्या मेळाव्यात काय बोलतात, त्याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. या संदर्भातल्या चर्चेने घेतलेले गंभीर वळण पाहूनच बहुधा मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी विषयाला थेटच हात घातला. समीर यांनी केलेल्या कामांची वाहवा करत आपल्याला अजून खूप काम करायचे असल्याचे त्याचे म्हणणे असल्याचे भुजबळांनी जाहीरपणे सांगून टाकले. तसेच, अशा चर्चांमुळे गृहकलह आहे की काय, असा समजही उगाचच पसरत असल्याचे सांगून त्यांनी आपली मनोभूमिका स्पष्ट केली. परिणामी, आता पवार काय बोलतात, त्याचे कुतूहल अधिकच वाढले. पण, थेट काही बोलण्यापेक्षा पवारांनी नेहमीप्रमाणे सूचक वक्तव्य करणेच पसंत केले.

बाकी हा मुद्दा वगळता मेळाव्यात तसे फार काही नव्हतेच. लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना त्या संदर्भांपेक्षा ‘भुजबळ टच’ने साकारलेल्या राष्ट्रवादी भवनाचे कोडकौतुक करण्यावरच नेतेमंडळींच्या भाषणातील वेळ अधिक खर्ची पडला. तसे पाहता, हा मेळावा म्हणजे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळच असेल, असे वातावरण असताना प्रत्यक्ष मेळाव्यात मात्र तसे चित्र जाणवले नाही. गर्दी बर्‍यापैकी असली तरी उपस्थितांचा प्रतिसाद मात्र म्हणावा तसा नव्हता. निवडणुकीचा माहौल जसा बनत जाईल, तशी ही उणीव किती भरून निघते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. अर्थात, मेळाव्याच्या आदल्याच दिवशी ‘हाय टी’साठी थेट रामदासभाईंना आपल्या निवासस्थानी पाचारण करण्याची खेळी करणार्‍या भुजबळांसाठी ती फार काही मोठी बाब नाही. मेळाव्यात एकीकडे समीर यांच्या कामाचे कौतुक, तर दुसरीकडे मोदी आणि आम आदमी पार्टीवर टीका करून कांद्यासह अन्य मुद्यांना हात घालत पवारांनी राष्ट्रवादीच्या परिघात राष्ट्रीय मुद्दे सामावून घेत कार्यकर्त्यांना आपल्या लक्ष्याची जाणीवही करून दिली. पण, आता कुठे ही सुरुवात असल्याने तूर्त दिल्ली सगळ्यांसाठी तशी दूरच असल्याचे म्हणावे लागेल.