आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉवरफुल मेळाव्यासाठी निरीक्षकांची भागमभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा यशस्वी करण्यासाठी निरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्षांची चांगलीच धावपळ सुरू आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तीन तालुके पिंजून काढत या निरीक्षकांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातही मेळावा घेतला. दरम्यान, शक्तिप्रदर्शनासाठी प्रत्येक पदाधिकार्‍याला कार्यकर्त्यांच्या जमवाजमवीचे टार्गेटदेखील देण्यात आल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विभागीय मेळावा 24 नोव्हेंबर रोजी डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अप्रत्यक्षपणे नारळही फोडले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याही उमेदवारीची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्याद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करून वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने निवडणुकीप्रमाणे मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी निरीक्षक म्हणून दिनकर तावडे यांना पाठवले आहे.

तावडे यांनी शहर व जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकी घेऊन तयारीला सुरुवात केली आहे. शुक्रवारी मालेगाव, चांदवड व येवला या तालुक्यांत भेटी देऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते मेळाव्याला कसे जमा होतील, याचे नियोजन त्यांनी केले. पक्षापासून दूर असलेल्यांनाही मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, तीन तालुक्यांचा दौरा आटोपून सायंकाळी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचाही मेळावा तावडे यांच्या उपस्थितीत त्रिमूर्ती लॉन्स येथे पार पडला.

निरीक्षकांबरोबरच जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष शरद कोशिरे, मनपा गटनेते कविता कर्डक, माजी खासदार देवीदास पिंगळे, सुनील बागुल, अर्जुन टिळे, छबू नागरे, सचिन पिंगळे आदी पदाधिकारीही सहभागी आहेत.

अशी होणार जमवाजमव
डोंगरे वसतिगृह मैदानाची क्षमता लक्षात घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एका पदाधिकार्‍याने दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांना साधारण तीन हजार कार्यकर्त्यांचे टार्गेट देण्यात आले आहे, तालुकास्तरावरील पदाधिकार्‍यांना एक हजार, तर जिल्हा परिषद सदस्य व ग्रामीण भागातील पदाधिकार्‍यांना किमान 500 कार्यकर्ते तरी आणावेत, अशा सूचना दिल्याचे समजते.