आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राखली सत्ता, पंचायत समिती सभापतिपदी चुंभळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकेसह जिल्हा परिषदेतील सत्ता गमवाव्या लागलेल्या राष्ट्रवादीने नाशिक पंचायत समितीवर मात्र आपली सत्ता कायम राखली. जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांचे पती तथा विल्होळी गणाचे राष्ट्रवादीचे सदस्य रत्नाकर चुंभळे यांची सभापतिपदी, तर देवरगाव गणाच्या सदस्या कविता बेंडकुळे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. 
 
नाशिक पंचायत समितीच्या जागांपैकी जागा राष्ट्रवादीने जिंकल्याने त्यांचा सभापती होणार हे आधीपासूनच निश्चित होते. त्यात सोमवारी अपक्ष विजय जगतापही राष्ट्रवादीला येऊन भेटल्याने राष्ट्रवादीची संख्या झाली. त्यामुळे केवळ निवडणुकीची औपचारिकताच मंगळवारी पार पडणार असल्याचे आधीपासूनच स्पष्ट होते. त्यानुसार सकाळी ११ वाजेपासून नाशिक पंचायत समितीत सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. प्रथम सभापतिपदासाठी रत्नाकर चुंभळे यांनी तर उपसभापतिपदासाठी कविता बेंडकुळे यांनी अर्ज सादर केला. दोन्ही पदांसाठी केवळ एक-एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड होणार यावर शिक्कामोर्तब झाले. परंतु, तहसीलदारांनी आपल्या अधिकारानुसार माघारीची वेळ देण्यासह सर्वच प्रक्रिया पूर्ण करून बरोबर दीड वाजेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. 
 
त्यात रत्नाकर चुंभळे यांची सभापतिपदी आणि त्यानंतर लागलीच उपसभापतिपदी कविता बेंडकुळे यांची घोषणा केली. त्यांना प्रमाणपत्रही वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, अर्पणा खोसकर, पंचायत समिती सदस्या छाया डंबाळे, विजया कांडेकर, विजय जगताप, ढवळू फसाळे, माजी सभापती मंदाबाई निकम, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघ,राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, माजी शहराध्यक्ष अर्जुन टिळे, मनपाचे माजी स्थायी सभापती शिवाजी चुंभळे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण- आरोग्य सभापती दिलीप थेटे आदींसह मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
निवडणुकीप्रसंगी त्र्यंबकेश्वररोडवरील पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळाने त्यांना पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात पाचारण करण्यात आले. निवडीची घोषणा करताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला. त्यानंतर सभापती आणि उपसभापतींचे अभिनंदनही करण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...