आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात दागिने लुटण्याचे सत्र सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पोलिस असल्याचे सांगून शहरात वृद्ध, महिलांचे दागिने पळविणार्‍या आणि महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लुटण्याचे प्रकार सुरूच असून हे गुन्हे रोखण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. शुक्रवारी भरदिवसा महात्मानगर परिसरात पोलिस असल्याचे भासवून एका महिलेचे सव्वा लाखांचे दागिने लांबविल्याची घटना घडली.
मालती नंदलाल कनोजिया रा. महात्मानगर या घरासमोरुन जात होत्या. तेव्हा ‘पुढे खून झाला आहे’ असे दोन अनोळखी व्यक्तींनी सांगितले. दागिने काढून ठेवा, असे सांगत महिलेने पिशवीत दागिने ठेवताच चोरट्यांनी पिशवी लंपास केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिसांना अपयश
सोनसाखळी हिसकावण्याच्या मंगळवारी भरदिवसा चार घटना घडल्या असून आठवडाभरात आठ ते दहा घटना घडल्या. दुसरीकडे तोतया पोलिसांकडून महिलांना गंडविल्याचे प्रकार घडत आहेत. भद्रकाली, सरकारवाडा, उपनगर व गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होत असले तरी एकही गुन्हा उघडकीस येत नाही.


सराफाच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी
महिलांची व नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या सराफाच्या साथीदारांना 2 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


सातपूर कॉलनीत नागरिकांची सुमारे 27 लाख रुपयांची फसवणूक करून नक्षत्र ज्वेलर्सचा संचालक सचिन उदावंत फरार झाला आहे. याप्रकरणी 27 महिलांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी सराफाचे साथीदार राजू धूत, मुकेश कुशारे व अमोल कदम यांना अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना 2 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली.


दुकानांत चोरी
गोविंदनगर भागात तीन दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी मोबाइलसह संगणक साहित्य चेारून नेले. अनिल बबलाद यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मद्यपींवर गुन्हा दाखल
सिडकोसह परिसरात पोलिसांनी गुरुवारी रात्री नाकाबंदी करत सहा मद्यपींना वाहने चालविताना ताब्यात घेतले. याप्रकरणी अबंड, इंदिरानगर व सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.