आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारिकांच्या लाक्षणिक संपामुळे रुग्णांचे झाले हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शुश्रूषासंवर्गातील अधिपरिचारिकांची सेवा नियमिततेसाठी राज्य सरकारने परीक्षा बंधनकारक केल्याच्या निषेधार्थ राज्यातील परिचारिकांनी बुधवारी एकदिवसीय संप पुकारला होता. शहरात हा संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा परिचारिका संघटनेने केला. या संपाचा तडाखा शासकीय रुग्णालयांतील रुग्णांना बसला.
जिल्ह्यातील ५००हून अधिक परिचारिका संपात सहभागी झाल्यामुळे शासकीय रुग्णालयाची व्यवस्था बुधवारी कोलमडली होती. या संपानंतरही शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्यास बेमुदत संप करू, असा इशारा ‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन’ संघटनेने दिला. सरकारच्या नवीन आदेशाप्रमाणे परिचारिकांची पात्रता परीक्षा घेतली जात आहे. यासाठी ज्येष्ठ परिचारिकांनाही पात्रता परीक्षा द्यावी लागत आहे. या आदेशाला परिचारिकांनी कडाडून विरोध केला.

४० वर्षांच्या सेवेनंतर पात्रता तपासणी घेण्याची गरज काय, असा प्रश्न परिचारिकांकडून विचारला जात आहे. परिचारिकांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. तसेच, परिचारिकांना अनेकदा कारकुनी कामांमध्ये गुंतवून ठेवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला. प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या सचिव कल्पना पवार यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षेसंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देण्यात आले.

प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी सांभाळली कामे : परिचारिकांनीबुधवारी पुकारलेल्या एकदिवसीय संपामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व कामे प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी पार पाडली. किरकोळ कामे उपचारदेखील प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी केले. मात्र, जिल्हा रुग्णालयात दिवसभरात एकही मोठी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही.

१०० टक्के यशस्वी, ऑपरेशनही रद्द झाले..
^सरकारच्या नवीनआदेशा प्रमाणे परिचारिकांच्या पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी ज्येष्ठ परिचारिकांनाही पात्रता परीक्षा द्यावी लागत आहे. परीक्षा देणे बंधनकारक केलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात एकदिवसीय संप पुकारला होता. तो १०० टक्के यशस्वी झाला असून, यामुळे मोठे ऑपरेशनही रद्द झाले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करू.- कल्पना पवार, सचिव,नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशन