आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कालिदास’मध्ये आयोजनास ‘नेट’ने एन्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाकवी कालिदास कलामंदिरातील विशिष्ट ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महापालिकेनेच आता पुढाकार घेतला असून, कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी ऑनलाइन पद्धती कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे आता कोणालाही कोठूनही कार्यक्रमांच्या आयोजनासाठी नोंदणी करणे शक्य होणार आहे. येत्या पंधरा दिवसांत ही पद्धत अमलात येईल.

‘कालिदास’च्या तारखा मिळविण्यासाठी सामान्यांना मोठे दिव्य पार पाडावे लागते. कारण मक्तेदारी असलेल्या दोघा ठेकेदारांनी यापूर्वीच कार्यक्रमांची आगाऊ नोंदणी केलेली असते. नियमानुसार तीन महिन्यांच्या कालावधीतच आगाऊ नोंदणी करता येते. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक कालावधीनंतरची नोंदणी केली जात असल्याचे निदर्शनास येते. ‘नाट्य’क्षेत्रात ‘सेवा’ देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेले ‘फ्रेंड्स’चे ‘सर्कल’च येथे बघायला मिळते. पालिकेच्या भाषेत त्याला ‘रिंग’ करणे म्हणतात. वर्षभरात होणार्‍या एकूण कार्यक्रमांपैकी 50 टक्के कार्यक्रम या ठेकेदारांसाठीच नोंदणीकृत असतात. विशेष म्हणजे, कार्यक्रम हाताशी नसतानाही संबंधित ठेकेदार कलामंदिराची नोंदणी करून ठेवतात. त्यामुळे अन्य आयोजकांना या ठेकेदारांकडून तारखा घ्याव्या लागतात. सामान्य आयोजकांची ही ससेहोलपट दूर करण्यासाठी पालिकेने ‘कालिदास’मधील कार्यक्रमांची नोंदणी ‘ऑनलाइन’ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका एजन्सीला हे काम दिले असून, ही एजन्सी स्वॉफ्टवेअर विकसित करत आहे.

प्रायोगिक नाटकांना लाभ : महिन्यातून एक दिवस प्रायोगिक नाटकाला अत्यल्प शुल्कात कलामंदिर द्यावे, असा नियमच आहे. प्रत्यक्षात हा नियम कागदावरच राहत असल्याचे प्रायोगिक नाटकांचे कलावंत सांगतात. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन नोंदणीचा फायदा होऊ शकणार आहे.

सर्वांना संधी मिळेल
‘कालिदास’मध्ये सर्वांना कार्यक्रम मिळावे, यासाठी ऑनलाइन पद्धत कार्यान्वित करीत आहोत. यू. बी. पवार, अधीक्षक अभियंता, पालिका

सकारात्मक प्रयत्नांचे स्वागतच
‘कालिदास’च्या विकासासाठी पालिकेच्या ऑनलाइन बुकिंगसारख्या सकारात्मक प्रयत्नांचे स्वागतच आहे. नाट्यक्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी नियमावलीतही सुधारणा हवी. महिन्यातील प्रत्येकी दोन शनिवार व रविवार प्रायोगिक नाटकांसाठी व ठेकेदारांव्यतिरिक्त इतर संयोजकांसाठी असावेत. - दत्ता पाटील, नाट्य दिग्दर्शक

ऑनलाइनने हे लाभ
> नोंदणी केलेल्या तारखांची माहिती
> तारीखनिहाय कार्यक्रमांची माहिती
> नाशिक बाहेरूनही नोंदणी शक्य
> नोंदलेल्या तारखेत बदल अशक्य
> नेट बँकिंगद्वारे आगाऊ रक्कम आणि नाट्यगृहाचे भाडे भरता येणार
> आगाऊ नोंदणी शुल्क देताना कोणी घासाघिस करणार नाही
> मोठा वेळ वाचेल, तसेच तारखांसाठी होणारी कटकटही कमी होईल.