आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांना 2015 मध्ये हे प्रकल्प प्रत्येक्षात साकारलेले पाहायला मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतुरता, उत्सुकता, नूतनतेची आस अशा अनेकानेक भावना मनी दाटत असताना भूतलावरील प्रत्येक जण नववर्षाचे स्वागत करत असतो. वैयक्तिक प्रगतीची आशा आणि अपेक्षांचे काहूर नवीन वर्षात सगळ्यांच्याच मनात दाटून आलेले असते. त्यामुळेच व्यक्तिगत यशाच्या आलेखासह महानगराचाही विधायक विकास घडून येणे ही विकासाची खरी व्याख्या ठरते.
नूतन नववर्षात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक कामांचा धडाका उडणार आहे. नाशिककरांना कोणते प्रकल्प २०१५ मध्ये प्रत्यक्षात साकारलेले पाहायला मिळणार आहेत, त्याची केवळ जंत्रीच देता त्यातून नाशिककरांना होणारे लाभदेखील मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. असा विकास हाच खऱ्या अर्थाने महानगराच्या उन्नतीत तसेच नागरिकांच्या जीवनमानात मोलाची भर घालणारा ठरत असतो. त्यामुळेच नूतन वर्षात पूर्णत्वास येऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची ही झलक..
विमानतळावरून रखडलेली विमानसेवा या वर्षी सुरू होणार आहे. विमानतळ हस्तांतरणाचा तिढा सोडविण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी देशाच्या संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहीले असून नाममात्र लिजचा प्रस्ताव जानेवारीमध्ये मान्य होण्याची चिन्हे आहेत.
सोविका एविएशन या कंपनीने सेवा देण्यासाठी उत्सुकताही दर्शविली आहे. तसे झालेच तर फेब्रुवारी महिन्यापासून नाशिककरांना ही सेवा उपलब्ध होवू शकणार आहे.

इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब
नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, देशातील एकूण स्वीचगिअर्स आणि ब्रेकर्सच्या उत्पादनांपैकी ८० टक्के उत्पादन एकट्या नाशिकमध्ये होते. मात्र, हे उत्पादन तपासणीसाठी भोपाळ किंवा बंगळुरू येथील केंद्रीय तपासणी प्रयोगशाळांत पाठवावे लागते. त्यात उद्योजकांचा वेळ, पैसा वाया जातो. ही सुविधा नाशिकमध्ये मिळावी, अशी मागणी उद्योगांकडून सातत्याने होत होती. त्यानुसार, केंद्र शासनाने पाचशे कोटी रुपयांची इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबला मंजुरी दिली आहे. मागील वर्षी जागा देण्याला स्थानिकांनी विरोध केल्याने ते काम पुढे जाऊ शकले नाही.
मात्र, आता या जागेचा तिढा जवळपास सुटल्याने या लॅबचे बांधकाम यावर्षी सुरू होऊ शकणार आहे.नाशिकचे उद्योग क्षेत्र हे इंजिनिअरिंग कंपन्या, तसेच इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांवरच प्रामुख्याने अवलंबून असल्याने टेस्टिंग लॅब म्हणजे नाशिकच्या उद्योगांसाठी वरदान आहे.

> भोपाळ, बंगळुरूनंतरची ही तपासणी कार्यशाळा असल्याने औद्योगिकदृष्ट्या नाशिकचे महत्त्व वाढणार
> किमान एक हजार नवे रोजगार निर्माण होऊ शकतील
> इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक्स उद्योगांच्या तपासणीकरिता वेळ, पैसा वाचणार; उत्पादन खर्चात कपात होणार
> ओढा आणि परिसराचा कायापालट करण्याची क्षमता आहे या प्रकल्पात
चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क
वाहतुकीच्या समस्यांना नाशिककरांना रोजच तोंड द्यावे लागते. त्यातून मार्ग काढण्यासाठी चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कची संकल्पना पुढे आली आणि नाशिक फर्स्ट या संस्थेने उपक्रमास दत्तकही घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, तिडके कॉलनीतील अडीच एकर जागा महापालिकेने नाशिक फर्स्टकडे हस्तांतरित केली आहे. या दोन्ही संस्थांमध्ये करारही झाला आहे. या पार्कमध्ये बसथांबा, रेल्वे स्टेशन, रस्ते आणि रस्त्यांवरील सूचनाफलक, वाहतुकीचे नियम दर्शविणारे फलक, पेट्रोलपंप, शाळा, मॉल्स, उड्डाणपूल, अंडरपास आदींच्या प्रतिकृती असतील. तसेच, मुलांना छोटेखानी वाहने दिली जातील. ही वाहने चालविताना वाहतुकीच्या नियमांचे कसे पालन करायचे, त्याचे प्रशिक्षण दिले जाईल. येत्या मे महिन्यापर्यंत हा पार्क पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही महानगरातील सध्याची सर्वाधिक गंभीर समस्या म्हणजे तेथील वाहतूक हीच आहे. त्यात प्रत्येक महानगरात दरवर्षी वाहनांच्या संख्येत पडणारी भर ही अक्षरश: दहा हजारांच्या पटीत आहे. त्यामुळे कितीही मोठे रस्ते असले तरी ते आता कमीच पडू लागले आहेत. अशा परिस्थितीत त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर केवळ मोठ्या माणसांना उपदेश करून समस्येचे निराकरण होणार नाही. हे लक्षात घेऊन नाशिक फर्स्टसारख्या संस्थेने पुढाकार घेत संपूर्ण नाशकात कुठेच नसलेला ट्रॅफिक पार्कसारखा अनाेखा प्रकल्प हातात घेण्याचा संकल्प केला. प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने सरकला आहे.
फायदे
>बालकांना लहानपणापासूनच येऊ शकेल ट्रॅफिक सेन्स
> बालकांच्या निमित्ताने पालकांनादेखील कळतील नियम
> तीन कोटींपर्यंतच्या खर्चातून हजारोंचे प्रबोधन
> १११८.५८ चौरस मीटरचे पार्कमधील रस्ते आणि ९९५.३६ चौरस मीटरच्या वाहनतळामुळे सगळ्यांचीच सोय

सुपर कॉम्प्युटरने नाशिक होणार कनेक्ट
सुपर कॉम्प्युटिंगमध्ये स्किल मॅनपॉवर तयार करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबईच्या कुडा सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिले अत्याधुनिक नोडल सेंटर नाशकात साकार होणार आहे. ‘मविप्र’ समाज संस्थेच्या कर्मवीर अॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात हे केंद्र सुरू होत असून, इंजिनिअरिंगसह कॉम्प्युटर क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना सुपर कॉम्प्युटरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सेंटरमुळे नाशिकच्या शैक्षणिक विकासात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.
नोडल सेंटरमध्ये स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब तयार करण्यात येईल. त्यात सुपर कॉम्प्युटर इन्स्टॉल केले जाणार असून, त्यासाठीचे वेगळे सर्व्हरही कनेक्ट केले जातील. या सेंटरसाठी एक कोटीहून अधिक खर्च प्रस्तावित आहेत. नोडल सेंटरमधून नाशिक विभागातील सर्व अभियांत्रिकी संगणक विज्ञान महाविद्यालये सुपर कॉम्प्युटरशी कनेक्ट केले जाणार असून, त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र सेंटर असेल.

सुपर कॉम्प्युटर ही संकल्पनाच नाशिकच्या संगणक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणाईला मोहवून टाकणारी आहे. त्यामुळे त्यासाठीचे स्किल्ड मॅनपॉवर उपलब्ध होण्यासाठीच्या नोडल सेंटरबाबत सर्व तरुणांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नाशिकमध्ये अशा प्रकारची सुविधा प्रथमच उपलब्ध होणार असल्याने हजारो युवकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

फायदे
>नाशिक विभागातील अभियांत्रिकी संगणक विज्ञान महाविद्यालये सुपर कॉम्प्युटरने कनेक्ट होऊन अॅक्सेस मिळेल.
> सुपर कॉम्प्युटरचे प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फायदा मिळेल.
> कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने आयटी हब विकसित होण्यासाठी मदत.

मनपाचा ‘शॉपिंग मॉल’ आराखडा लोकाभिमुख
महापालिकेचा पहिला सुसज्ज शॉपिंग मॉल जुन्या नाशकातील महात्मा फुले मंडईच्या जागेवर २०१५ मध्ये बांधण्यात येणार आहे. फुले मार्केट परिसराच्या ठिकाणी चार मजली शॉपिंग मॉल तयार करण्यात यावा, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. या ठिकाणी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्याकडून पाहणीदेखील झाली आहे.
आयुक्त बदलल्यामुळे हे काम काही महिन्यांपासून प्रलंबित होते. खासगीकरणांतर्गत होणाऱ्या या चार मजली मॉलसाठी २५ कोटी खर्च येणार असून, या ठिकाणी चारशे व्यावसायिकांना उत्पन्नाचे साधन प्राप्त होणार आहे. या शॉपिंग मॉलच्या या इमारतीत १२ हजार ५६३ चौरस फुटांची बेसमेंट पार्किंग, पहिल्या मजल्यावर दुचाकीसाठी वाहनतळ, तिसऱ्या मजल्यावर ३९७ गाळे, ८-१० आणि १०-१५ लांबीचे हे गाळे राहतील. या चार मजली इमारतीत चार लिफ्ट चार मुख्य प्रवेशद्वार राहणार आहेत.नाशिकमध्ये महापालिकेचा अशा प्रकारचा मॉल कुठेही अस्तित्वात नाही. त्यामुळे महापालिकेकडून उभारल्या जाणाऱ्या या मॉलबाबत जुने नाशिक परिसरात प्रचंड उत्सुकता आहे.
१९९३ नंतर शहराच्या भविष्यकालीन नियोजनासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.
नगररचना विभागाच्या सहसंचालकांकडे हा आराखडा तयार करण्याचे काम असून, येत्या फेब्रुवारी अखेरपर्यंत तो पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. अर्थात, या कालावधीतही आराखडा पूर्ण होऊ शकला नाही तर शासनाकडे त्यास मुदतवाढदेखील मागण्यात येईल. शहराच्या पुढील २० वर्षांचे नियोजन या आराखड्यात असेल. हा आराखडा लोकाभिमुख असेल, असे यापूर्वीच सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी स्पष्ट केले आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे पूररेषेचा यंदा प्रथमच समावेश आराखड्यात होणार आहे. ही रेषा हरित क्षेत्रात असली तरीही गावठाणासाठी मात्र हा निकष बदलण्यात येणार आहे.

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालक सुलेखा वैजापूरकर यांनी हा आराखडा तयार केला. परंतु, तो प्रसिद्ध होण्याआधीच फुटल्याने वादग्रस्त ठरला. त्यामुळे त्या विरोधात शेतकऱ्यांची जन आंदोलनेदेखील झाली. परिणामत: महासभेने तो विकास आराखडा फेटाळल्याने ते काम राज्यशासनाने स्वत:कडे घेऊन सहसंचालक प्रकाश भुक्ते हा आराखडा तयार करीत आहेत.

फायदे
>कपडा मार्केट, भाजी मार्केट एक जागेवर राहणार असल्याने नागरिकांना सुविधा
> या मॉलमुळे शेकडो बेरोजगार युवकांना तसेच नागरिकांना मिळेल रोजगार
> चारशे गाळ्यांचा व्यापाऱ्यांना होणार फायदा
> आधुनिक मॉलमुळे परिसराचा कायापालट

फायदे
>नवीन आराखड्यात आरक्षणांची संख्या कमी होणार
> आरक्षित जागेच्या बदल्यात मिळणार अडीच टीडीआर
> नवीन आराखड्यात रोड नेटवर्कवर भर
> आराखड्यात नगररचना योजनेचा अंतर्भाव करण्यास आग्रह
नव्या प्लॅटफॉर्मने भाविकांचा ताण हलका
कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक रेल्वेने येणार असल्याने रेल्वे प्रशासनाकडून स्थानकावरील तीन प्लॉटफॉर्मच्या संख्येत दोनने वाढ होईल.चौथ्या प्लॅटफॉर्मला ट्रॅक राहणार आहे. रेल्वे स्थानकावर पाच प्लॅटफोर्मला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची उभारणी केली जात आहे.सध्याच्या तीन प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पुलाला नवीन समांतर पूल राहणार आहे. प्रवासी या पुलावरून कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तसेच स्थानकाबाहेर जाऊ शकणार आहेत.

फायदे
>रेल्वे स्थानकाचा २५.३४ कोटी रुपये खर्च करून कायापालट
> सिंहस्थात स्थानकावर भाविकांमुळे वाढणारा ताण चौथ्या प्लॅटफॉर्ममुळे कमी होण्यास मदत > मुख्य प्रवेशद्वारावरील ताण पूर्वेकडील प्रवेशद्वारामुळे कमी होईल.

रुग्णालय महिलांसाठी आणि धर्मशाळा
शालिमार भागात २००८ मध्ये सुमारे ३० कोटी रुपये खर्चून सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच, दोन मजली न्यूरो सर्जरी प्लास्टिक सर्जरी विभागासह गोरगरीब रुग्णांसाठी १०० खाटांची धर्मशाळा या रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे. संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारात महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. महिलांसाठी आणि प्रसूत महिलांच्या नवजात बालकांसाठी राज्यातील पहिलेच रुग्णालय सुरू होणार असल्याने नाशिक जिल्हा आरोग्य विभागाचा रोल मॉडेल ठरणार आहे. महिलांसाठीचे हे स्वतंत्र रुग्णालय गोरगरीब महिलांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

फायदे
>शंभरखाटांच्या धर्मशाळेमुळे सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार >किडनी ट्रान्सप्लांट सेंटरमुळे मूत्रपिंडविकार रोगाचे निदान आणि त्यावर उपचार मिळण्यास होणार मदत
> -न्यूरोसर्जरी विभागामुळे मुंबई, पुण्याऐवजी संदर्भ रुग्णालयात उपचार शक्य
> प्लास्टिक सर्जरीची सुविधाही नाशकात होणार उपलब्ध