आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा लॉन्स-होळकर पुलापर्यंत घाट, महापौर देणार प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसेच्या सत्ताकाळात लोकोपयोगी कामे करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धडपड सुरू झाली असून, गोदावरी नदीवर चोपडा लॉन्स ते होळकर पुलादरम्यान घाट बांधण्याचा प्रस्ताव महापौर अशोक मुर्तडक यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून तपोवनाप्रमाणे गोदावरीच्या वरच्या भागातील घाटावर लोकांना पर्यटनासाठी जाता येईल. तसेच गंगावाडीतील उद्यानाचे नूतनीकरण करून येणाऱ्या पर्यटकांसाठी विरंगुळा केंद्र बनविण्याचाही विचार सुरू आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाहीस्नानासाठी येणाऱ्या भाविकांना नदीपात्रात सहज प्रवेश करता यावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून घाट बांधले जात आहेत. या घाटांचा भविष्यासाठी उपयोग व्हावा, यासाठी येथे उद्यानांची निर्मिती केली जात आहे. अशाच घाटांची निर्मिती गोदावरीच्या वरच्या भागात करण्याचा विचार सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रस्ताव पुढे आला.
नदीपात्रात घाट तर बाहेर गोदापार्क यामुळे गोदावरी नदी एक पर्यटनस्थळ बनविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी येथील नदीपात्राची स्वच्छताही करण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. दरम्यान, घाटांची देखभाल स्वच्छता मात्र पालिकेमार्फत स्वतंत्र घंटागाडी कर्मचारी नेमून करण्याचाही इरादा बोलून दाखविला.

स्वच्छतेसाठी पंचवटी पॅटर्न :
महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांची नुकतीच बैठक घेतली असून, यात स्वच्छतेसाठी शहरात पंचवटी पॅटर्न राबविण्याचा मानस व्यक्त केला. त्यात पंचवटी विभागात एकही तक्रार येणार नाही या दृष्टीने स्वच्छता निरीक्षकांना काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर हा पॅटर्न यशस्वी ठरला तर तो शहरात राबविण्याचा मानसही महापौरांनी व्यक्त केला.

सारे लक्ष गोदापार्कवर

राज ठाकरे यांनी गोदापार्क या ड्रीम प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत केले असताना महापौरांनीही देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चार दिवसांपासून ते रोज गोदापार्कची पाहणी करत असून, येथील मलबाही उचलला जात आहे. येथील काम वेगाने सुरू असून, स्वच्छता बघण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेची यंत्रणा तैनात आहे.