आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Machinery Purchased In Nashik Bitako Hospital

उधळपट्टी : सिंहस्थासाठी २३ काेटींच्या नवीन उपकरणे खरेदीचा घाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कामांच्या नावाखाली महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने उधळपट्टी सुरू केली असून, ज्या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्याचे काम आताशी पूर्ण झाले त्या रुग्णालयासाठी तब्बल २३ कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी)मध्ये हे काम विनाखर्च होऊ शकत असतानाही यंत्रसामग्री खरेदीचा प्रयत्न सुरू असल्याने हा सिंहस्थ साधूंचा की, संधिसाधूंचा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिकरोड येथे बिटको रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अतिशय मंद गतीने होणाऱ्या या कामासाठी खर्च मात्र मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचा दावा केला जात आहे. या रुग्णालयात एमआरआय, सिटी स्कॅन आणि डीआर सिस्टिम या तीन उपकरणांच्या खरेदीसाठी तब्बल २३ कोटी खर्च करण्याचा प्रयत्न वैद्यकीय विभागाने सुरू केला आहे. ही उपकरणे रुग्णालयासाठी आवश्यक असली, तरीही ती विकत घेण्याची आवश्यकताच नाही.
‘पीपीपी’मधून अशा प्रकारची उपकरणे काही संस्था महापालिकेस देऊ शकतात. त्यातून महापालिका कोणत्याही आर्थिक खर्चात पडत नाही. संबंधित रुग्णाकडून अतिशय अल्प शुल्क आकारून ही व्यवस्था लावली जाते. मात्र, खरेदीतून मिळणाऱ्या टक्केवारीकडे लक्ष देऊन वैद्यकीय विभाग थेट उपकरणांच्या खरेदीसाठी प्रयत्नशील झाल्याची टीका महापालिकेत होत आहे. यासंदर्भात प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही.

महत्त्वाच्या नागरी कामांसाठी खर्च करा

मुंबई महापालिकेत ‘पीपीपी’च्या माध्यमातून अशी अनेक कामे केली जातात. त्यामुळे महापालिकेवर आर्थिक बोजा पडत नाही. नाशिकमध्ये मात्र अधिकाऱ्यांना खरेदीतच अधिक रस दिसतो. या २३ कोटींचा उपयोग अन्य नागरी कामांसाठी करण्यात यावा. त्यामुळे विकासाला हातभार लागू शकेल. अजय बोरस्ते, गटनेते, शिवसेना

घोडा खरेदीपूर्वीच नाल खरेदी

बिटको रुग्णालयाच्या पाच मजल्यांच्या बांधकामाला सध्या मंजुरी मिळालेली असून, त्यावर तीन मजले प्रस्तावित आहेत. यातील केवळ पहिल्या मजल्याचेच काम आजवर झाले आहे. म्हणजे रुग्णालयाचे कामही पूर्णत्वास आलेले नसताना महागड्या उपकरणांच्या खरेदीचा घाट घातला जात आहे. हा प्रकार म्हणजे घोडा खरेदी करण्यापूर्वीच नाल खरेदी करण्यासारखा असल्याची टीका शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.
खत प्रकल्पातही यापूर्वी कोट्यवधींच्या यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात आली आहे. या यंत्रसामग्रीचा वापर करणारी यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याने ती धूळखात पडून आहे. अशीच अवस्था आता वैद्यकीय विभागाच्या यंत्र सामग्रीचीही होण्याची शक्यता आहे.