आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Police Recruitment In Next Three Month Says R R Patil In Nahsik

तीन महिन्यांत 12 हजार पोलिस पदांची भरती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना बारा-बारा तास ड्यूटी करावी लागते. त्यातच साप्ताहिक सुट्या, रजा मिळत नसल्यामुळे निर्माण होणार्‍या तणावावर नियंत्रण राखण्यासाठी येत्या तीन महिन्यांत राज्यभरात सुमारे 12 हजार अतिरिक्त पोलिस पदांची भरती केली जाणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या 108 व्या दीक्षांत समारंभानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाढते औद्योगिकीकरण, बांधकाम, शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या विकासाबरोबरच सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत आहे. जनतेच्या मालमत्ता आणि जीविताच्या संरक्षणाच्या जबाबदारीबरोबरच इतरही आव्हाने पोलिस दलासमोर निर्माण झाली आहेत. अधिकारी-कर्मचार्‍यांना दररोज 12 ते 14 तास काम करावे लागत आहे. सण, उत्सवाच्या काळातही साप्ताहिक सुट्या, रजा मिळत नसल्याने तणाव निर्माण होऊन काही अप्रिय घटना घडत असतात. या रोखण्यासाठी पोलिसांना सक्तीने साप्ताहिकसुटी आणि आठ-नऊ तासांचे काम करण्यासाठी अतिरिक्त पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्य शासनाने परवानगी दिली असून, येत्या चार वर्षांत राज्यभरात 61 हजार पदे टप्प्याटप्याने निर्माण करून भरती केली जाईल. यातील 12 हजार पदे येत्या तीन महिन्यांत भरती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यामध्ये काही अधिकारी पदांचा समावेश आहे. पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली असून, अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने उभारण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून काढून व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

दाभोलकर हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडेच
अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असून, पोलिस दलातील अनुभवी आणि वरिष्ठ अधिकारी तपास करीत आहेत. मला पोलिस दलावर विश्वास असून, तेच याचा छडा लावतील. त्यामुळे सीबीआय अथवा इतर संघटनेकडे तपास देण्याची गरज वाटत नाही. यावर दाभोलकर कुटुंबीयांनीदेखील विश्वास दर्शविल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

नियोजन आराखड्यात स्वतंत्र आरक्षण
महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर मोठमोठय़ा रहिवासी वसाहतींना बांधकामांचे परवाने देताना स्वतंत्रपणे पोलिस ठाण्यांसाठी जागा आरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनस्तरावर प्रादेशिक विकास आराखड्यातही आरक्षणे निश्चित करण्याबाबत आदेश देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

कुंभमेळा तयारीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा
सिंहस्थ कुंभमेळा दीड वर्षावर येऊन ठेपलेला असताना प्रशासनाकडून पायाभूत सुविधा, पोलिस बंदोबस्तासाठी आवश्यक सुविधा, बांधकामे हाती घेण्यात आलेली नाहीत. तसेच, सीसीटीव्ही कॅमेरे व इतर नियोजनाबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. सद्यस्थितीत कुठलेही काम सुरू नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च अधिकारी व्हायचय
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून गांभीर्याने अभ्यास केला. पोलिस दलात आठ वर्षांपुर्वीच शिपाई म्हणून दाखल झालो असून आतापर्यंत कमांडो ट्रेनिंग पुर्ण करीत एक वर्ष गडचिरोली येथे सेवा बजावली आहे. थेट उपनिरीक्षक परिक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशिक्षण पुर्ण केले. यापुढील काळात खाकी वर्दीचा सन्मान वाढविण्याचे कार्य आपल्या हातून घडेल. वडील माजी सैनिक, भाऊ माध्यमिक शिक्षक असून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खात्यात सर्वोच्च अधिकारी व्हायचं स्वप्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, कोठावडे गावचा रहिवासी आणि एमए पर्यंत शिक्षण पुर्ण केले आहे. राजेंद्र गुरव,(तलवारीचा मानकरी)

(फोटो : पोलिस प्रबोधिनीच्या दीक्षांत सोहळ्यात ‘बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच’ ठरलेले राजेंद्र गुरव यांना मानाची तलवार प्रदान करताना गृहमंत्री आर. आर. पाटील. समवेत सतेज पाटील, संजीव दयाळ, सूर्यप्रकाश गुप्ता, संजय बर्वे.)