आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकुंडाकडून पंचवटीकडे जाणे होणार सोयीचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रामकुंडाकडून पंचवटीकडे जाण्या-येण्यासाठी पंचवटी वाचनालयाच्या वास्तूशेजारील काही पाय-या काढून वाहतुकीसाठी व्हायाडक्ट पद्धतीचा पूल बांधण्यात येणार आहे.

या पुलामुळे रामकुंडाकडून पंचवटीकडे जाण्यासाठी परतीचा मार्ग आता वाहनचालकांनाही उपलब्ध होणार आहे. स्थायी समितीच्या गुरुवारी (दि. 7) होणा-या बैठकीत हा नवा पूल व रस्त्याच्या साडेसहा कोटींच्या प्राकलनाला मंजुरी घेण्यात येणार आहे. पंचवटीकडून रामकुंडाकडे जाण्यासाठी सध्या रस्ता असला, तरी रामकुंडाकडून पंचवटीकडे जाण्यासाठी मात्र वाहनचालकांना सोयीस्कर ठरणारा रस्ताच नाही. सध्या वाहनचालकांना कपालेश्वर मंदिरासमोरील खांदवे सभागृहामार्गे पंचवटी कारंजावर जावे लागते. इंद्रकुंड परिसरात पाय-या असल्याने त्याचा वापर वाहनचालकांना करता येत नाही. त्यामुळे आता परतीच्या मार्गाची व्यवस्था होणार आहे. काही पाय-यांच्या जागी रस्ता व छोटेखानी पूल बांधण्यात येणार असून, तो चारचाकी वाहनांनाही उपयुक्त ठरणार आहे.

मे 2015 पर्यंत होणार रस्ता
स्थायी समितीच्या येत्या गुरुवारी होणा-या सभेत या रस्त्याच्या कामाला मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर नऊ महिन्यांच्या आत म्हणजे मे 2015 पूर्वी हा रस्ता पूर्णत्वास येणार आहे.