आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Step : One Percent Fertilazar 99 Percent Ash

नव्या पाऊल वाटा : एक टक्क्याचे खत 99 टक्क्यांची राख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रतिदिन 347 टन संकलन होणार्‍या कचर्‍यातून अवघी एक टक्का खतनिर्मिती होत आहे. दहा वर्षांपूर्वी हेच प्रमाण 15 टक्के होते. प्रकल्पावर दरमहा होणारा खर्च वाढत जाऊन 25 लाख रुपयांवर येऊनही त्यातून मिळणारे उत्पन्न आणि कचरा विल्हेवाटीचे प्रमाण पाहता साडेतीन लाख टन कचर्‍याचे डोंगर कमी करण्यासाठी प्रशासनाने नामी युक्ती शोधत त्यास आग लावण्याचे काम सुरू केले आहे.

60 कोटींची मशिनरी पडून

खतप्रकल्पावर साठलेल्या साडेतीन लाख टन कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, घंटागाड्या वाहने खरेदी, सन 2031 पर्यंत खतनिर्मितीसाठी मशिनरी, कचर्‍याचे वर्गीकरण, जळावू भागाचा पॅलेट्स (विटा) तयार करणे, खडी व वाळूपासून बांधकामाच्या विटा तयार करणे, शास्त्रीय पद्धतीने उर्वरित कचरा साठविणे यांसह विविध कामांसाठी नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत पाच वर्षांपूर्वी 60 कोटींची मशिनरी खरेदी केली. मात्र, आजतागायत उद्घाटनापलीकडे मशिनरींचा एकदाही वापर झाला नाही. कुशल मनुष्यबळ नसताना केलेली खरेदी वादात सापडून संबंधित अधीक्षक अभियंत्याच्या चौकशीची मागणी व तसा ठराव होऊनही प्रशासनाकडून मात्र त्याकडे कानाडोळा केला जात आहे.

वर्षाला वाढला 12 टन कचरा

दहा वर्षांपूर्वी 200 टन इतका कचरा संकलित होत होता. मात्र, आता वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे सध्या हेच प्रमाण 347 टन प्रतिदिन असे पोहोचले आहे. यामुळे दहा वर्षांत वाढलेल्या कचर्‍याचा विचार केल्यास वर्षाला 12 टन कचरा वाढला आहे. एकीकडे कचर्‍याचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे खतनिर्मितीची आणि कचरा विघटनाची प्रक्रिया एक टक्क्यापर्यंत पोहोचल्याने खतप्रकल्पाला मरणावस्था आली आहे.
उत्पन्नापेक्षा खर्चच जादा

खतप्रकल्पावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन, वाहने, इंधन, देखभाल दुरुस्ती यांचा एकत्रित विचार केल्यास प्रकल्पासाठी दरवर्षी तीन कोटी खर्च केला जातो. मात्र, या तुलनेत खतनिर्मितीपासून मागील वर्षी केवळ 24 लाख इतकेच उत्पन्न मिळत असल्याने चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला अशी स्थिती झाली आहे. सन 2004-05 मध्ये- 67 लाख 72 हजार, 2005-06 मध्ये 59 लाख 73 हजार, तर 2006-07 मध्ये 53 लाख 25 हजारांचे उत्पन्न निर्मितीतून मिळाले होते.
कचरा चाळणीचे काम बंद

खतप्रकल्पावर प्रत्येक ढिगास दर सात दिवसांनी एकदा उलटपालट केली जाते. यानंतर कंपोस्ट झालेला कचरा यांत्रिकी चाळण्यांत चाळणी करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून कचर्‍यातील वाळू, खडी, काचा, खिळे, प्लास्टिकचे तुकडे वेगळे केले जातात. मात्र, सध्या ही प्रक्रियाच जवळपास बंद असल्याने खताचे उत्पन्न अत्यंत कमी झाले आहे. यामुळे कचर्‍याचे ढीग वाढलेले दिसत आहेत.
जमा होणार्‍या कचरा (टक्केवारीत)
> घराघरांतून जमा होणारा कचरा 90 टक्के
> भाजी मंडईतून जमा होणारा कचरा 5 टक्के
> रस्ते झाडणीतून जमा होणारा कचरा 5 टक्के

महासभेत लक्षवेधी मांडणार
महासभेत तसेच महापौर आणि आयुक्तांकडे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेतली जात नाही. कचर्‍याला आग लावून दिली जाते. आता ठोस भूमिकेसाठी महासभेत लक्षवेधी मांडणार. सुदाम कोंबडे, स्थायी समिती सदस्य

कचर्‍यात मातीचे प्रमाण अधिक
खतप्रकल्पातील मशिनरी पूर्ण क्षमतेने काम करीत नाही. यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. कचर्‍यात दगड, वाळू आणि मातीचे प्रमाण जास्त असते. यामुळे खतनिर्मिती कमी होत आहे. या बाबींचा गांभीर्याने विचार केला जाईल तसेच यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. डी. एम. पाटील, उपअभियंता, खतप्रकल्प