आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम : प्रत्येक शाळेत ५५ दिवस एकच ध्यास फक्त अभ्यास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाड्यापासून ते प्रभागापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, त्यांची गुणवत्ता वाढावी, दप्तराचे ओझे हलके व्हावे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण व्हावे, यासाठी शाळांसह विद्यार्थ्यांच्या घरीही अभ्यासाच्या वातावरणासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदरम्यान ५५ दिवसांच्या काळात ‘एकच ध्यास फक्त अभ्यास’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.
१९ फेब्रुवारी ते १४ एप्रिल यादरम्यान विविध परीक्षांचा कालावधी असल्याने शाळा, महाविद्यालये, वाचनालय, अभ्यासिका या सर्व ठिकाणी तसेच, घरीदेखील अभ्यासाचेच वातावरण असून, शेतीची कामेदेखील आता पूर्णत्वास आलेली आहेत. या वातावरणाचा फायदा घेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रत्येक पाड्यापासून ते शहरातील प्रत्येक प्रभागात हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच सहभागी करून घेण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकेल.

गुणवत्ता वाढीस मदत

^सर्वच शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या आदर्श अभियानांतर्गत आनंददायी शाळेसाठी दप्तराविना शाळा, रंगीत कागदाच्या वस्तू, मातीच्या वस्तू बनविणे, रांगोळी, मुक्तचित्रे काढणे, वेगवेगळे खेळ आणि गाण्यांचा समावेश असेल. एकूणच या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. अनिलशहारे, गटशिक्षणाधिकारी, नाशिक

सर्वच शाळांना आदेश...

^या अभियानाची सर्व तयारी करण्यात आली असून, सर्वच शाळांना याबाबत आदेशदेखील देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे १८ फेब्रुवारी रोजी सर्व मुख्याध्यापकांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नवनाथऔताडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी

असे असेल नियोजन...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून सुरू होणाऱ्या या अभियानात महाराजांच्या शौर्य कथांवर तज्ज्ञांची व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, किल्ल्यांवर सहलीचे आयोजन, दररोज शाळा सुरू होण्यापूर्वी एक तास वाचन, लेखन, सोप्या गणितीक्रिया अवगत नसणाऱ्या मुलांचा सराव करून घेणे, जीवनावश्यक इंग्रजी भाषेचे संवाद तयार करून मुलांचा सराव करून घेणे, गाव तसेच प्रभागातील अभ्यास मंडळे, स्वयंअभ्यास मंडळांच्या भेटी घेऊन त्यांना मुलांच्या अभ्यासासाठी मदत करणे, रात्री ते १० या काळात पालकांनी घरात अभ्यासमय वातावरण तयार करून मुलांचा अभ्यास घेणे, प्रत्येक इयत्तेनुसार पाठ्यपुस्तकातील ज्ञानावर आधारित सोपे आणि सामान्य ज्ञानाचे १०० प्रश्न विद्यार्थ्यांना देऊन ते पाठ करून घेऊन विद्यार्थ्यांना वर्गात जाहीर प्रश्न विचारून अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे.