आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटवस्तू देण्याचाही बदलतोय ‘ट्रेण्ड’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आपले स्नेही, आप्तस्वकीयांना दिवाळीची भेट म्हणून दिल्या जाणार्‍या भेटवस्तूंतही वेगाने बदल होत असून, विविध बँका, मॉल्स व नामांकित दालनांच्या गिफ्ट कूपन्सची चलती दिसून येत आहे. व्यावसायिक जगताकडून दिल्या जाणार्‍या पारंपरिक भेटवस्तूंची जागा आता सुकामेवा, मिठाईच्या बॉक्सबरोबरच हेल्थ कार्ड व गिफ्ट व्हाउचर्सने घेतली आहे.

दिवाळीत विविध व्यावसायिकांकडून आपले कर्मचारी, आप्त व मित्रांना भेट देण्यासाठी सुकामेवा, मिठाईचे बॉक्स दिले जात असल्याचे वर्षानुवर्षे पाहायला मिळते. मात्र, काही वर्षांपासून त्यात बदल होत असल्याचे चित्र आहे. शहरात खर्‍या अर्थाने मॉल कल्चर रुळले असून, बिग बझार, मोर, पॅन्टालून्स, रिलायन्स ट्रेन्झ यांसारख्या मॉल्समधून पाहिजे त्या मूल्यांचे विविध गिफ्ट व्हाउचर्स उपलब्ध आहेत. ज्या मॉलचे जितक्या किमतीचे व्हाउचर आहे, त्या किमतीची खरेदी ग्राहक करू शकतो. शर्ट, टी-शर्ट, जीन्स, पॅन्ट्स, बेल्ट, साड्या, मोबाइल्स, तसेच किराणा व दिवाळीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करता येतात. नानाविध वस्तूंचे पर्याय भेट स्वीकारणार्‍याला उपलब्ध होतात. ज्यामुळे मनपसंत खरेदी करता येते.


ब्रॅण्ड्ससोबतच बँकाही आघाडीवर
रिलायन्स ट्रेन्झ, बिग बझार, पॅन्टालून्स, मोर, ईझी डे यांसह विविध नामांकित मॉल्सकडून दिवाळीनिमित्त आकर्षक गिफ्ट व्हाउचर्स बाजारात आली आहेत. स्टेट बॅँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बॅँक यांसारख्या काही बॅँकांनीही याच संकल्पनेवर आधारित गिफ्ट कार्ड्स बाजारात आणली आहेत. सोनी गिफ्ट्ससारख्या शहरातील काही नामांकित भेटवस्तूंच्या दालनांनीदेखील आता ही संकल्पना स्वीकारली आहे. या दालनासह शहरातील काही महत्त्वपूर्ण गिफ्ट दालनांमध्येदेखील अगदी 100 रुपयांपासून व्हाउचर्स उपलब्ध आहेत.

हाताळायलाही असते अधिक सोपे
ज्या व्यक्तीला भेट द्यायची आहे, त्याला त्याची आवडती वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य गिफ्ट व्हाउचर्समुळे मिळते. मिठाई, ड्रायफ्रूट्सचे बॉक्स हाताळायला थोडे अवघड असतात.मात्र, गिफ्ट कार्ड हे भेटकार्डासह पाकिटातही देता येऊ शकतात. त्यामुळे त्याला अधिक पसंती मिळत आहे. सुरेश माळी, अध्यक्ष, अंबड इंडस्ट्रिज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन

गिफ्ट व्हाउचरला कॉर्पोरेट्सकडून पसंती
गिफ्ट व्हाउचरला कॉर्पोरेट्स क्षेत्राकडून चांगली पसंती मिळत आहे. अन्य कुठलेही गिफ्ट देण्याऐवजी आता व्हाउचर गिफ्ट देण्याचा ट्रेण्डही नागरिकांमध्ये हळूहळू रुजत चालला आहे. एकंदरीतच नाशिककरांचा दिवाळीची भेट देण्याबद्दलचा दृष्टिकोनही आता काळानुरूप बदलत चालला आहे. नितीन मुलतानी, संचालक, सोनी गिफ्ट्स