आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हॉट्स अँप’वरून दिवाळीच्या खरेदीला उधाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दिवाळीमध्ये खरेदी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असून, दुकानदारांच्या मोबाइलवर आपल्याला हवे असलेले ड्रेस, साडी, मॅचिंग ज्वेलरीचे फोटो व्हॉट्स अँपद्वारे ग्राहक पाठवत आहेत. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे या वस्तू दुकानदार तत्परतेने पुरविताना दिसत आहेत.

शहरातील अनेक दुकानदारांना आपल्या ग्राहकांसोबत व्हॉट्स अँपसारखे मोबाइलवरील अप्सवर नजर ठेवावी लागत आहे. व्हॉट्स अँपवर फोटो पाठवला आहे, तशीच साडी पाहिजे, परदेशातील चायनीज, अमेरिकन ज्वेलरी हवी आहे, असे संवाद अँपवर येत आहेत. दिवाळीनिमित्त विविध वस्तू खरेदी व विक्रीसाठी सध्या व्हॉट्स अँपचा वापर बाजारात जोरात सुरू असल्याने खरेदीचा नवा ट्रेंड चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हॉट्स अँपवरून अपेक्षित वस्तूंची माहिती दिल्यानंतर दुकानदार वस्तू काढून बाजूला ठेवतात. शिवाय, जर त्याच्या दुकानात ही वस्तू नसेल तर अन्य ठिकाणी कुठे मिळेल ते सांगतात. यंदा ग्राहकांची मागणी मालिका आणि सिनेमामधील अभिनेत्रींनी वापरलेली साडी किंवा बाजारात आलेल्या नवीन ट्रेंडप्रमाणे दागिने घेण्याकडे कल असतो.

ट्रेंड पाहून उत्पादने आपल्या दुकानात आणण्याची धडपड दुकानदारांची असते. इंदोर, भोपाळ, मुंबई, कोलकाता, गुजरात या ठिकाणी मार्केटमध्ये आलेले नवे फॅशन ट्रेंड याची माहिती दुकानदार इंटरनेटवरून सतत घेत असतात. यामुळे ग्राहकांच्या आवडीनुसार हव्या त्या डिझाइन व्हॉट्स अँपमार्फत पाठवून लगेचच या दुकानदारांकडून ऑर्डर दिली जात आहे.

व्हॉट्स अँपवरील ट्रेंड असे
बाजारात यंदा अनारकली पॅटर्न, बिग बॉस सलमान स्टाइल, राउडी राठोड, कॉटनच्या तसेच मोठय़ा बॉर्डरच्या साड्या व ड्रेस मटेरियलचा भरणा आहे. सध्या चेन्नई एक्स्प्रेस सिनेमाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे तशाच प्रकारच्या साउथ कॉटन साड्यांकडे महिलावर्ग आकर्षित होत आहे. तसेच, याच वस्तूंची मागणी व्हॉट्स अँपवर मोठय़ा प्रमाणावर होत आहे.