आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्षिप्त मोहिमेस व्यापक प्रतिसाद, 49 हजार नवमतदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने युवा मतदारांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे जिल्ह्यात 16 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या संक्षिप्त मोहिमेत 18 ते 19 वयोगटातील 49 हजार 166 मतदारांची नोंदणी झाली आहे. 16 हजार 900 स्त्री, तर 32 हजार 266 पुरुष मतदारांचा त्यात समावेश आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यात 18 ते 21 वयोगटातील मतदारांचे प्रमाण कमी असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आल्यानंतर यंदा आयोगाने कृषी विद्यापीठे वगळता अन्य सर्व विद्यापीठांच्या कुलसचिवांना ‘मतदार ब्रँड अँम्बेसेडर’ म्हणून जबाबदारी दिली. त्यांच्या अधिकारांतर्गत येणार्‍या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे आदेशही त्यांना दिल्यानंतर जिल्ह्यात काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने थेट महाविद्यालयांतच नोंदणी मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार, जिल्ह्यात जवळपास 18 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये सुमारे 50 हजारांचा पल्ला गाठला गेला आहे. जिल्हा निवडणूक विभागाने मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम पूर्ण केले असून, जिल्ह्यात 37 लाख 98 हजार 588 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात 17 लाख 84 हजार 955 स्त्री, तर 20 लाख 13 हजार 633 पुरुष मतदार आहेत. यामध्ये नव्याने एक लाख 71 हजार 378 मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली असून, 79 हजार 536 स्त्री, तर 91 हजार 842 पुरुषांनी आपले नाव नोंदवले आहे. तसेच, एक लाख 87 हजार 724 मतदारांना
नव्याने मतदान ओळखपत्र वितरित करण्यात आले आहे.

अंतिम यादी 31 जानेवारीस
मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण झाले असून, 31 जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. तरीही नवमतदारांसाठी निरंतर मोहीम सुरूच असून, त्यांना आताही आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. नोंदणीत महिलांचे प्रमाण कमी असून, त्यांनीच पुढाकार घेत स्वत:चे नाव मतदार यादीत नोंदवत मतदानाचा हक्क बजवावा. गीतांजली बाविस्कर, निवडणूक उपजिल्हाधिकारी

56 हजार नावे वगळली
नव्या मतदारांबरोबर मतदारयाद्या अद्ययावतीकरणांतर्गत मृत, स्थलांतर, दुबार नोंदणी असलेल्या 56 हजार 735 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यात पुरुष मतदार 30 हजार 862 आणि 25 हजार 873 स्त्री मतदारांची नावे कमी केली आहेत.