आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरू उद्यानाबाहेरील जुन्या अतिक्रमणांचा फास उद‌्ध्वस्त, अतिक्रमणविराेधी पथकाची ‘स्मार्ट कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राजकारण्यांच्या कृपाशीर्वादामुळे वर्षानुवर्षे नेहरू उद्यानाला पडलेला अतिक्रमणांचा फास महापालिकेच्या अतिक्रमणविराेधी पथकाने बुधवारी (दि. १३) उद्ध्वस्त केला. राजकीय विराेधाला जुमानता उद्यानाभाेवतालच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवण्यात अाली. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत लागलीच या भागाच्या पुनर्विकासाला त्वरित प्रारंभही करण्यात अाला अाहे. विक्रेत्यांच्या नेतृत्वाला स्पष्ट समज देण्यात अाल्यामुळे त्यांची हवा गुल झाल्यामुळे कारवाई ही नेहमीच्या ‘दिखाऊ’ कारवाईसारखी नसल्याचे चित्र निर्माण झाले अाहे. 
 
शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या या उद्यानाभाेवती किमान दाेन दशकांपासून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत २०-२५ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा विळखा पडलेला हाेता. नेहरू उद्यानाचा रस्ता म्हणजे जणू ‘फूड स्ट्रीट’ असल्यासारखेच चित्र निर्माण झाले हाेते. त्यातच ‘भाऊ, नाना, दादां’चा पाठिंबा असल्याने या विक्रेत्यांनी उद्यानाचे एक चतुर्थांश क्षेत्रही व्यापून टाकले हाेते. दिवसा मिसळपाव विक्रेत्यांच्या तर सायंकाळी चायनीज, भेळपुरी, अंडाभुर्जी, नाॅनव्हेज खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी या परिसरावर जणू कब्जाच केला हाेता. 
 
अशी झाली ‘स्मार्ट’ कारवाई : 
या विक्रेत्यांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने अतिक्रमणविराेधी विभागही कारवाई करायला फारसा धजावत नव्हता. त्यामुळे या अतिक्रमणधारकांची हिंमत अधिकच वाढली होती. उद्यानासमोरील सारडा कन्या शाळेतील विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनांमध्येही माेठ्या प्रमाणात वाढ झाली हाेती. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना अशा कठाेर कारवाईची अपेक्षा अनेक वर्षांपासून हाेती. मात्र, यापूर्वी अनेकदा थातुरमातूर कारवाई केल्यावर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ हाेत असे. मात्र, बुधवारच्या कारवाईचा धडाकाच वेगळा असल्याचे चित्र दिसून अाले. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उद्यानाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव जादूची छडी ठरला. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९.३० वाजता अतिक्रमण हटावच्या माेहिमेला प्रारंभ करण्यात अाला. भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली ४० ते ५० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात होता. 
 
यापूर्वीच्या कारवाया ठरल्या निष्फळ : खाद्यपदार्थविक्रेत्यांची ही अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने यापूर्वी तीनवेळा माेठी कारवाई केली हाेती. त्या कारवायांचा खूप गवगवाही झाला हाेता. मात्र, काही काळानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली हाेती. सर्वप्रथम २००४-०५ मध्ये मोहीम राबविली होती. त्यावेळी स्थानिक नेत्यांच्या बगलबच्च्या अतिक्रमणधारकांनी थेट महापौरांच्या कार्यालयात धुडगूस घालण्यापर्यंत मजल मारली हाेती . त्यावेळी अतिक्रमणे उद्यानाच्या भिंतीलगत होती. त्यानंतर पुन्हा २००९-१० मध्ये कारवाई करत या अतिक्रमणधारकांना प्रतिबंध करण्यासाठी थेट उद्यानासमोर रस्त्यावर भिंत बांधून घेतली हाेती. मात्र, या कारवाईला जुमानता विक्रेत्यांनी त्या भिंतीच्या अात तर दुकाने थाटलीच. शिवाय, भिंतीबाहेरही रस्त्याच्या दुतर्फा खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या करून एक प्रकारे महापालिकेलाच अाव्हान दिले. त्यानंतर गेल्या पंचवार्षिकातील अखेरच्या टप्प्यातही कारवाई झाली; मात्र तिचाही उपयाेग झाला नाही. 
 
विक्रेत्यांनी घातली हुज्जत 
पूर्वकल्पना देण्यात अाली असल्याने पथकाने उपस्थित खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्वरित हटविण्यास प्रारंभ केला. यावेळी बाचाबाची, गाेंधळ, अधिकाऱ्यांना घेरावासह अंगावर धावून जाण्याचे प्रकारही घडले. विक्रेत्यांनी जोरदार विरोध करत अतिक्रमण पथकातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. मात्र, कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे हा विरोध मोडीत निघाला. पथकाला या सर्व बाबींची कल्पना असल्याने पुरेसा पाेलिस फाैजफाटा दिमतीला घेण्यात अाला हाेता. परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळवत अतिक्रमणे काढून टाकत जागा महापालिकेने पुन्हा ताब्यात घेतली. उद्यानाच्या जागेत उभारलेला श्रमिक सेनेचा फलकही अतिक्रमणविराेधी पथकाने जप्त केला अाहे.

जेसीबी लावून पुनर्विकासाला गती 
अतिक्रमणहटवल्यानंतर महापालिकेने तत्काळ जेसीबी लावून उद्यानाच्या भागातील रस्ते, भिंत, फलक उखडून काढत पुनर्विकासाच्या प्रक्रियेला त्वरित प्रारंभ केला. त्यामुळे बुधवारी सकाळी १० पूर्वीचा नेहरू उद्यान परिसर नंतर पुरता बदलून गेला. मात्र, ही कारवाई शालिमारवरील संदर्भ रुग्णालयाच्या भिंतीनजीकच्या विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईप्रमाणे ठरू नये, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली अाहे. 
 
विक्रेत्यांची जवळच पुनर्वसनाची मागणी 
अतिक्रमणविराेधी माेहिमेदरम्यान श्रमिक सेनेचे नेते तथा भाजप पदाधिकारी सुनील बागुल यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत कारवाईपूर्वी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. श्रमिक सेनेच्या शिष्टमंडळाने उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांची भेट घेत उद्यानाच्या जागेलगत अथवा सारडा कन्या शाळेच्या भिंतीलगत विक्रेत्यांना व्यवसाय करू देण्याची विनंती केली. परंतु, हा परिसर ‘नो हॉकर्स झोन’ असल्यामुळे जुन्या नाशकातील घासबाजार अथवा मुंबईनाका परिसरातील रस्त्यालगत फेरीवाला झोनमध्ये त्यांचे पुनवर्सन शक्य असल्याचे उपायुक्त फडोळ यांनी शिष्टमंडळाला सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...