आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर: लष्कराचा जवान सुनीलची आत्महत्या नसून घातपात; कुटुंबीयांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- दिल्ली येथे देशसेवेत रुजू असलेले भारतीय लष्कराचे जवान सुनील रामचंद्र पाटोळे (३४) यांनी स्वत:कडील एके-४७ रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त खोटे असल्याचा आरोप त्याच्या नातलगांसह ग्रामस्थांनी केला. गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात पाटोळे यांच्यावर ठाणगाव या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या नातलगांनी सुसाइड नोट प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखविली. त्यावर संशय व्यक्त करत ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला. संरक्षणमंत्र्यांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
 
कौटुंबिक कारणास्तव सुनीलने आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. मात्र, बुधवारी (दि. १५) सकाळी दिल्ली येथे पोहाेचलेले सुनीलचे वडील रामचंद्र पाटोळे, भाऊ शरद पाटोळे मामा यांनी घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीतील सुनीलच्या हस्ताक्षरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

गेली चौदा वर्षे लष्करात सेवा बजावणाऱ्या सुनीलचे कुटुंबीयांशी कधीही कुठल्याही प्रकारचे भांडण नसताना तो असे टोकाचे पाऊल उचलणारच नाही, असे भाऊ शरदचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच सुनीलची सेवानिवृत्तीची वेळ झाली होती. मात्र, त्याने पुन्हा दोन वर्षे सेवा वाढवून घेतली.
 
पुढील महिन्यांत तो सेवानिवृत्त होऊन कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी येणार होता. त्यामुळे सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे सुरू होते. सुनीलचे कुटुंबीयांसोबत नेहमी बोलणे होत असत. त्रासामुळे हा साराच प्रकार संशयास्पद असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.दरम्यान, गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ठाणगावी त्याचे पार्थिव पोहाेचल्यानंतर चार वाजेच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी ‘सुनील पाटोळे अमर रहे...’, ‘भारतमाता की जय...’ अशा घोषणा देत सुनीलला मानवंदना दिली. मात्र, १४ वर्षे देशसेवेसाठी वेचलेल्या सुनीलचा अंत्यविधी लष्करी इतमामात झाल्याने त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना नातलगांसह ग्रामस्थांनी व्यक्त केली. याप्रसंगी माजी सैनिक संघाचे नाशिक अध्यक्ष गुरुदास पाटोळे, आप्पासाहेब कोडग, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

हस्ताक्षरही संशयास्पद 
सुनीलचेमराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व होते. मात्र, लष्करी अधिकाऱ्यांनी दाखविण्यात आलेल्या सुसाइड नोटमध्ये असलेली हिंदी-मराठी एकत्रित शब्दरचना सुनील करूच शकत नाही. सुनीलच्या हस्ताक्षराशी त्या चिठ्ठीतील अक्षरे जुळत नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. चिठ्ठीत कुठेही कौटुंबिक कलहाचा उल्लेख नसताना जाणूनबुजून अशा प्रकारच्या वृत्ताला प्रसिद्धी देऊन कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात अाले. 
 
बातम्या आणखी आहेत...