आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठ्या शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्याचा विचार; विनाेद तावडे यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिक्षणपद्धतीत वेगाने बदल होत असल्याने लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळांच्या धर्तीवर राज्यभरातील १०० मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यात येणार अाहे. ज्या शिक्षण संस्थांच्या ५० तसेच १०० हून अधिक शाळा आहेत, अशा शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्याचा विचार सरकार करत अाहे. त्यामुळे संस्थास्तरावरच त्यांना नवीन अभ्यासक्रम तसेच परीक्षा घेणे शक्य होईल. गरजेनुसार नवीन अभ्यासक्रमही विकसित करता येऊ शकतील, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नाशिक येथे केले. 


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शतकमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील १०० वर्षे पूर्ण केलेल्या संस्थांच्या दोन दिवसीय “शतायुषी संस्था संवाद’ संमेलनाचे उद््घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले. स्वायत्तता मिळाल्यानंतर शिक्षण संस्थांना चांगल्या पद्धतीने कामकाज करता येणार असल्याने याबाबत संस्थांनी आपल्या सूचना मांडाव्यात. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण संस्था सुरू करून १०० वर्षे ती संस्था चालविण्याचे काम सोपे नाही. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिक्षण संस्थांचा ज्ञानयज्ञ अखंड सुरू आहे. शिक्षण हा उद्योग नाही हे या शिक्षण संस्थांनी आपल्या प्रदीर्घ शिक्षण कार्यातून दाखवून दिले आहे. 


तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल होत आहे. १०० वर्षांपासून कार्यरत शिक्षण संस्थांनी आता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसेच बदलत्या काळानुसार, गरजेनुसार बदलणे गरजेचे असून, त्यासाठी मोठ्या शिक्षण संस्थांना स्वायत्तता मिळाल्यानंतर बदलणे शक्य होऊ शकेल. नवीन अभ्यासक्रम विकसित करून त्यांची परीक्षा स्वत: संस्थेच्या स्तरावर घेतल्यानंतर त्याचे मूल्यांकन करून गुणवत्ताही वाढविणे शक्य होईल. स्वायत्तता मिळाल्यानंतरही शाळांना दिले जाणारे अनुदान सुरूच राहणार असल्याने स्वायत्तता मिळाली म्हणजे अनुदान बंद होईल असे होणार नाही, हेही स्पष्ट केले. शिक्षकांवर सध्या दहावी बारावीचे परीक्षा अर्जांसह इतर ऑनलाइन कामांचा ताण पडत असल्याने ऑनलाइन कामे कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात अाहे. शिक्षकांना देण्यात येणारी शाळाबाह्य कामे कमी करण्यासाठी मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतल्याचेही तावडे यांनी सांगितले. 


संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय काकतकर होते. १०० वर्षे पूर्ण केलेल्या संस्थांना एकत्र करून त्यांचे विचारमंथन घडवण्याचा हा कार्यक्रम नक्कीच उपयोगी पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षणतज्ज्ञ सुमन करंदीकर, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इ. वायुनंदन, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी मनाेगत व्यक्त केले. संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. 


माजीमुख्यमंत्र्यांच्या घोषणा अजूनही निस्तरतोय
राज्यातीलसर्व मोठ्या शिक्षण संस्थांचालकांना एकाच व्यासपीठावर भेटण्याची संधी मिळाली. त्यामुळे शिक्षक संस्थाचालकांना खुश करण्यासाठी जाहीर कार्यक्रमांत आम्ही घोषणा करणार नाही. कारण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या घोषणा अजून आम्ही निस्तरतोय, असे सांगत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चव्हाण यांच्यावर टीका करत घोषणा करता शिक्षण संस्थांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असे सांगितले. 


पोलिस पडताळणी नाही 
सीबीएसईने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पोलिस पडताळणी गुन्ह्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सक्तीचे केले आहे. मुंबईत काही शाळाही अशी सक्ती करत आहेत. मात्र, राज्य मंडळाच्या शाळांमध्ये अशी सक्ती करण्याचा विचार नाही, असे तावडे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...