आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ असे का करते?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ती सध्या काय करते’ असा एक चित्रपट मध्यंतरी येऊन गेला. या चित्रपटापेक्षा अधिक चर्चा झाली ती म्हणजे शीर्षकाची. साेशल मीडियावर या शीर्षकाचा अाधार घेत बऱ्याच गमतीजमती, टीका-टिप्पणी, मिश्कीलीही झाली. मात्र, गेल्या अाठवड्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात उमलत्या कळीला खुडण्याचे स्त्रीभ्रूण हत्येचे रॅकेट उघडकीस अाल्यानंतर या सर्वामागे एका महिलेचाच हात असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यावर ती असे का करते असा प्रश्न मंथनाचा चिंतनाचा विषय बनला अाहे. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे, एरवी महिलांबाबत साधे खुट्ट झाले की पुढाकार घेणाऱ्या महिला संघटना असाे की राजकीय पक्ष. या प्रकरणाबाबत काेणीही साधी विचारण्याची तसदी घेतल्यामुळे सामाजिक भान केवळ साेयी-साेयीपुरते दाखवले जाते का, उमलत्या कळ्यांचा जगण्याचा हक्क हिरावण्याची बाब गंभीर नाही का सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुंपणाकडूनच शेत खाण्याच्या प्रकाराबाबत कायमस्वरूपी उपाय हाेणार का याबाबत काेणीही बाेलत नाही यासारखे दुर्दैव नसावे. 
 
गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रीभ्रूण हत्येचा विषय अत्यंत गंभीर बनला अाहे. मुलगी म्हणजे खांद्यावर अाेझे हा समज स्त्रीभ्रूण हत्येचे उगमस्थान असल्याचे लपून राहिले नाही. वंशाला दिवा म्हणून मुलाच्या अट्टाहासात काेवळ्या कळी उमलण्यापूर्वीच खुडण्याचा क्रूरपणा ‘माता तू वैरिणी’ या भावनेतून दाखवला जात अाहे. विशेष म्हणजे असे प्रकार समाजात, प्रत्येक गावात, गल्लाेगल्ली या कानाचे त्या कानाला कळणार नाही अशापद्दतीने सुरू अाहे. असे प्रकार उघडकीस अाले की धक्का बसल्याप्रमाणे ‘अरे बापरे’ अशी प्रतिक्रिया द्यायची, ही अाई की काेण, किती गं बाई निर्दयी अशी निंदा करण्यापलीकडे स्त्रियादेखील फार काही करीत नसल्याचे दुर्दैवी चित्र अाहे. मध्यंतरी अभिनेता अामीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या लाेकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कार्यक्रमात स्त्रीभ्रूण हत्येचा विषय चांगलाच गाजला. त्यानंतर बीडमध्ये डाॅ. मुंडे हाॅस्पिटलमध्ये मानवतेला काळिमा फासणारे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस अाल्यावर पुन्हा चर्चा झाली. सातारा, सांगली, काेल्हापूर, जिल्हा काेणताही असाे वा प्रदेश, सामाजिक संतुलनावर परिणाम करणाऱ्या या घटकाविषयी फक्त बाेलण्यातून संवेदनशीलता व्यक्त हाेते प्रत्यक्षात कृतीच्या नावाने ठाेस काही नाही हीच बाब माेठी चिंतेची अाहे. 
 
या सर्वाचा ऊहापाेह करण्याचे कारण म्हणजे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वांना सून्न करणारे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस अाल्यानंतर त्याविषयी महिला संघटना, सामाजिक संस्था, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा देणारे राजकीय पक्ष यापैकी काेणीही फारसे पुढे अाले नाही. भाजप अामदार देवयानी फरांदे यांचा एकमेव अपवाद असला, तरी या प्रकरणात त्या वैयक्तिक स्वरूपात अग्रभागी हाेत्या मात्र पक्ष म्हणून राज्यात सत्तेत असलेल्या या पक्षाकडून स्थानिक पातळीवर साधी विचारणाही झाली नाही. सत्ताधारी साेडा, मात्र विराेधी पक्षही मुग गिळून बसले. शिवसेना, काँग्रेस, मनसेने तर ‘ब्र’ही काढला नाही. सरकारी अधिकाऱ्यांशी पंगा कशाला या विचारातून बहुदा माघार घेतली गेली मात्र सर्वात धक्कादायक राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका राहिली. या पक्षाचे सर्वेसर्वा खासदार सुप्रिया सुळे यांच्या युवती काँग्रेसचा एकेकाळी स्त्रीभ्रूण हत्याविराेधी माेहिमेचा अजेंडा हाेता. 
 
नाशिकमध्ये युवती काँग्रेसची संघटनाही तळापर्यंत अाहे. मात्र, काेणाकडूनही विचारणा झाली नाही. प्रकरण खरे की खाेटे इतके याचीही शहानिशा झाली नाही. राष्ट्रवादीने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवागाराच्या दुरवस्थेबाबत अांदाेलन केले. मयतांचे हाेणाऱ्या हालाविषयी जागरूक हाेऊन केलेले अांदाेलन समर्थनीयच हाेते मात्र, त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे उमलू पाहणाऱ्या कळ्यांचा जगण्याचा अधिकार हिरावणाऱ्या कृत्याची हाेती. मात्र, राष्ट्रवादीला त्याविषयी विचारणा गरजेची वाटली नाही. इतकीच गंभीर बाब काँग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याकडूनही झाल्याचे सांगितले जाते. अाराेग्य संचालकांकडून चाैकशीसाठी पाठवलेल्यांना वैयक्तिक संबंध वापरून खासगी भेटी घेण्यापासून तर अन्य हस्तक्षेपाच्या कथित चर्चा सून्न करणाऱ्या अाहेत. अशा प्रकरणात संबंध काेणते वा कितीही असले तरी तटस्थपणा ठेवणे गरजेचे असते. दुर्दैवाने त्याउलट प्रयत्न करण्याची बाब ती असे का करते या प्रश्नाचे उत्तर शाेधण्यासारखीच ठरेल. मुळात या प्रकरणात राजकीय, सामाजिक अशा सर्वस्तरावरून संवेदना व्यक्त झाल्या असल्या तर निर्ढावल्या सरकारी यंत्रणेला झुकणे भाग पडले असते. अापले काेणीही बिघडवू शकणार नाही या उन्मादातून अलीकडेच सरकारी यंत्रणेकडून बिनधास्त गैरकृत्य करण्याची हिंमत दाखवली जात अाहे. त्यातूनच रक्षकच भक्षक हाेण्याजाेगे प्रकार घडत अाहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ बातमी वाचून हळहळ व्यक्त करण्यापुरता मर्यादित नाही. या प्रकरणाशी संबंधित अनेक कड्या जुळणे बाकी अाहे. डाॅ. वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई झाल्यामुळे याचा अंत झाला असेही मानून चालणार नाही. या रॅकेटमधील प्रत्येकाची पाेलखाेल हाेणे महत्त्वाचे अाहे. त्यासाठी सामाजिक भान ठेवून यंत्रणेवर दबावगट तयार करणे गरजेचे अाहे. अशा दबावगटामुळे खरे खाेट्याचा निकाल लागणार अाहे. 
 
मुळापर्यंत काेण जाणार? 
सिव्हिलमध्येएका उमलत्या कळीला खुडल्याचा प्रकार उघडकीस अाला. प्रत्यक्षात यापूर्वी अशी किती प्रकरणे घडली असतील, त्यासाठी काेण जबाबदार असेल. एकट्या स्त्रीराेग डाॅ. वर्षा लहाडे या प्रकरणाला जबाबदार असतील असे धरून चालणार नाही. सरकारी खात्यात काम करताना एकट्याच्या जिवावर इतके गंभीर प्रकरण हाेत असेल यावर काेणाचाही विश्वास बसणार नाही. थाेडक्यात या प्रकरणात तथ्य वा सत्य अाढळले असेल तर मुळाशी जाणे भाग अाहे.
 
महापालिकेच्या वैद्यकीय पथकाच्या तपासात १९० गर्भपाताच्या प्रकरणाची अांतररुग्ण कागदपत्रे गहाळ असल्याचे समाेर अाले. अाता ही कागदपत्रे तयार करून सादर करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा अाहे. मुळात इतक्या संवेदनशील विषयाची कागदपत्रे पथकाला दिलीच का गेली नाही, ही दडवादडवी का झाली वा कागदपत्रात काही गंभीर अनियमितता हाेत्या याचा शाेध घेतला जाणे गरजेचे अाहे. निफाडमधील उंबरखेड गावातील एक महिला खासगी हाॅस्पिटलमधून प्रवास करीत सिव्हिलमध्ये गर्भपातासाठी अालीच कशी याचा मुळाशी जाऊन चाैकशी झाली पाहिजे. खराेखरच गर्भपात हाच उद्देश हाेता की गर्भपात करण्यासाठी भीती दाखवून भाग पाडले गेले यासारख्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. तरच राेगाच्या मुळापर्यंत जाऊन इलाज हाेणार अाहे. अन्यथा वरवर इलाज करून ही भयंकर जखम बरी तर हाेणारच नाही, कालांतराने चिघळल्यास त्याचा ताप संपूर्ण समाजव्यवस्था संकटात सापडण्याजाेगी ठरल्यास नवल वाटणार नाही. 
बातम्या आणखी आहेत...