आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून जगभर पक्ष्यांची गणना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जागतिक पातळीवर ग्रेट बॅकवार्ड बर्ड काउंट शनिवार ते सोमवारपर्यंत आयोजिले असून त्यामध्ये देशभरातील पक्षीप्रेमी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात सोलापूरसह, पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, जळगाव येथील पक्षीनिरीक्षक सहभागी होऊन ऑनलाइन निरीक्षण नोंदविणार असल्याचे, अमरावतीचे मानद वन्यजीवरक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.

डॉ. वडतकर म्हणाले, “ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट अंतर्गत भारतातील जवळपास एक लाख पक्षीनिरीक्षकांनी गेल्यावर्षी निरीक्षण नोंदविले होते. साडेसातशेपेक्षा जास्त प्रजातींच्या पक्ष्यांच्या नोदी ऑनलाइन केल्या होत्या. त्यावेळी जगभरात भारताचा दुसरा क्रमांक होता. जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या दहा पक्षीनिरीक्षकांपैकी सहा निरीक्षक भारतातील होते. पक्ष्यांच्या संदभातील अनेक दुर्लक्षित संशोधनात्मक माहिती त्याद्वारे मिळते. तसेच, पक्ष्यांना सोईस्कर वातावरण मिळते? कोणत्या प्रजाती धोकादायक श्रेणीत आहेत? कोणत्या प्रजातींची वाढ झाली आहे? याबाबतची माहिती मिळण्यास मदत होईल.”

मोहिमेत विदर्भ, खानदेशातील पक्षीमित्र जास्त सक्रिय असून पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्यातही त्याबाबतची जागरुकता वाढत असल्याचे, त्यांनी सांगितले.

जवळच्या परिसरात पक्षीनिरीक्षण करून त्यांच्या संख्येसह नोंदणी ऑनलाइन करायची आहे. किमान १५ मिनिटांपेक्षा जास्त निरीक्षण करावेत. ती यादी ई-बर्ड या संकेतस्थळावर पक्ष्यांच्या संख्येसह नोंदवावी, असे आवाहन संयोजकांनी केले.

^सोलापूर शहरजिल्ह्यातील हौशी पक्षीमित्र या उपक्रमात सहभागी होणार आहेत. प्रत्येकाने त्यांच्या घराच्या परिसरातील पक्ष्यांचे निरीक्षण करून, त्याच्या नोंदी, छायाचित्रांसह छोटी माहिती ऑनलाइन शेअर करावी. या उपक्रमांमुळे पक्ष्यांबाबतची जनजागृती वाढण्यास मदत होते. श्रीकांत बडवे, पक्षीमित्र,पंढरपूर